या वेळी त्यांनी झापावाडी येथील लघु पाटबंधारे तलावास भेट देऊन कामाची पाहणी केली. तसेच या वेळी अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय आल्यामुळे हे काम पूर्ण होऊ शकले नाही, त्यामुळे यावर्षी पाणी साठवणूक होणार नाही, हे लक्षात येताच त्यांनी जल विमोचकाचे काम तातडीने करून यावर्षी अर्ध्या क्षमतेने पाणी साठवणूक करण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व ठेकेदारांना दिल्या. याचबरोबर त्यांनी म्हासुर्ली येथे सुरू असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाची पाहणी करून काम अत्यंत संथ गतीने व निकृष्टपणाने सुरू असल्याने नाराजी व्यक्त केली. सदर कामाच्या गतीत व दर्जात बदल न झाल्यास संबंधितांवर आपण स्वतः कारवाई करणार असल्याचे सांगितले.
या वेळी त्यांनी परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेऊन कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या. त्यांच्यासोबत सागर धुंदरे यांच्यासह युवराज पाटील सर, रवी पाटील गवशीकर, सर्जेराव चौगले आदींसह येथील सरपंच, उपसरपंच, सदस्य व विविध मान्यवर उपस्थित होते.