कोल्हापूर : महापालिकेकडून दिल्या जाणाऱ्या बायोमेट्रिक कार्डाकरिता फेरीवाल्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याची बाब मंगळवारी महापालिका आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत समोर आली. त्यामुळे अशी बायोमेट्रिक कार्डे देण्याकरिता दि. १० जानेवारी २०२० पर्यंत अंतिम मुदत देण्यात येईल. त्या मुदतीत सर्व आवश्यक कागदपत्रे फेरीवाल्यांनी इस्टेट विभागाकडे सादर करावीत, असे आवाहन आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह फेरीवाले कृती समितीनेही केले.शहरातील फेरीवाल्यांच्या प्रश्नांसंबंधी चर्चा करण्याकरिता मंगळवारी आयुक्त डॉ. कलशेट्टी यांनी सर्वपक्षीय फेरीवाले कृती समितीच्या सदस्यांची तसेच अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत बायोमेट्रिक कार्ड, फेरीवाल्यांवर होणारी कारवाई, फेरीवाला धोरण, फेरीवाला समिती या अनुषंगाने चर्चा झाली.ज्या फूटपाथवर विक्रेते बसतात त्यांच्यावर कारवाई करा, तसेच बाहेरगावांहून टेम्पो कोल्हापुरात आणून ठिकठिकाणी चौकांत अडथळा होईल अशी वाहने लावून जे भाजी विक्री करतात, त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही त्यात हस्तक्षेप करणार नाही, असेही कृती समितीने सांगितले. फेरीवाला समित्यांकरिता निवडणूक होईपर्यंत जुन्याच समित्यांचे अस्तित्व कायम ठेवण्याचा निर्णय यावेळी झाला.बैठकीस आर. के. पोवार, दिलीप पवार, नंदकुमार वळंजू, रघुनाथ कांबळे, भाऊसाहेब गणपुले, अशोक भंडारे, महंमद शरीफ शेख, सुरेश जरग, समीर नदाफ, राजू जाधव यांच्यासह अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, विभागीय अधिकारी हर्षजित घाटगे, रमेश मस्कर, आर. के. पाटील उपस्थित होते.