जयसिंगपूर : चंदूर-टाकळीदरम्यान कृष्णा नदीवर उभारण्यात येत असलेल्या पुलामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी शुक्रवारी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी केली. यावेळी कर्नाटकातील चिकोडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार गणेश हुक्केरी उपस्थित होते. यावेळी कर्नाटक शासनाच्यावतीने ठेकेदाराला नदीपात्रात टाकलेला भराव काढण्याबाबतच्या सूचना दिल्या. यावेळी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे.
मांजरी कडील बाजूने पुलासाठी टाकलेल्या भरावामुळे अतिवृष्टीमुळे नदीपात्रातील वेगाने वाहणाऱ्या पाण्याने टाकळीकडील बाजूच्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. यावेळी चर्चेदरम्यान चंदूरकडून टाकलेला भराव काढून घेण्यात यावा, असे ठरले होते. त्याची अंमलबजावणी होताना कर्नाटक शासनाच्या बांधकाम विभागाने संबंधित ठेकेदाराला नदीपात्रात असलेला भराव काढून घेण्याचे आदेश दिले आणि त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. हा भराव काढून घेतल्यामुळे येणाऱ्या काळात अतिवृष्टी होऊन नदीपात्रातील पाण्याचा वेग वाढला तर टाकळीकडील भागातील शेतकऱ्यांचे पुन्हा नुकसान होणार नाही, यासाठीही उपाययोजना राबवली जात आहे. आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व चिकोडीचे आमदार गणेश हुक्केरी यांनी तातडीने केलेल्या या कार्यवाहीमुळे टाकळी परिसरातील शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.