कोल्हापूर : आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने मराठा समाजातील मुलांना शिक्षण, नोकरीमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. त्यामुळे आरक्षण पुन्हा मिळविण्यासाठी सकल मराठा शौर्य पीठाने बुधवारपासून पुन्हा आंदोलनाचा यल्गार पुकारला आहे. आरक्षणासाठी जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. येथील शिवाजी चौकामध्ये या शौर्यपीठाच्यावतीने सायंकाळी पाचच्या सुमारास यल्गार आंदोलन करण्यात आले.
एक मराठा लाख मराठाह्ण, आरक्षण आमच्या हक्काचे, अशा घोषणा देत निर्दशने केली. यावेळी शौर्यपीठाचे समन्वयक प्रसाद जाधव यांनी आंदोलनाची भूमिका मांडली. राज्य आणि केंद्र सरकारने लक्ष घालून घटनापीठाकडून मराठा समाजाला आरक्षण पुन्हा मिळवून द्यावे. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकरभरती स्थगित ठेवावी.
होतकरू, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्कामध्ये सवलती द्याव्यात. शुल्कातील फरक सरकारने राखीव निधीतून करावा या मागण्यांसाठी पुन्हा आंदोलन सुरू केले असल्याचे जाधव यांनी सांगितले. या आरक्षणासाठी शौर्यपीठाच्यावतीने जनहित याचिका दाखल केली जाणार आहे. त्याबाबत आवश्यक ते मार्गदर्शन, सहकार्य करणार असल्याचे कोल्हापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रणजीत गावडे यांनी सांगितले.
यावेळी प्रकाश सरनाईक, राहुल इंगवले, चंद्रकांत पाटील, राजू जाधव, उदय लाड, जयदीप शेळके, शिवाजी लोंढे, राजमाता जिजाऊ ब्रिगेडच्या सुनिता पाटील, सुधा सरनाईक, सुवर्णा मिठारी, लता जगताप, छाया जाधव, गायत्री राऊत, आदी उपस्थित होते.