कोल्हापूर : शिंगणापूर येथून कसबा बावडा फिल्टर हाऊसकडे अशुद्ध जल उपसा करणारा पंप अचानक बंद पडल्याने गुरुवारी शहराच्या काही भागांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा झाला, आज, शुक्रवारीसुद्धा अशीच परिस्थिती राहणार आहे.
शिंगणापूर येथील पंप दुरुस्तीचे काम पाणीपुरवठा विभागाच्या वतीने युद्धपातळीवर हाती घेतले असून हे काम गुरुवारी रात्री उशिरापर्यंत पूर्ण होईल, असे पाणीपुरवठा विभागाने म्हटले आहे.
गुरुवारी कसबा बावडा परिसर, लाइन बाजार, रमणमळा, नागाळा पार्क, ताराबाई पार्क, सदर बाजार, कनाननगर, स्टेशनरोड, न्यू शाहूपुरी, शाहूपुरी पहिली ते चौथी गल्ली, पाच बंगला, साइक्स एक्स्टेशन, कावळा नाका, रुईकर कॉलनी, महाडीक वसाहत परिसर, लिशा हॉटेल परिसर, कारंडे मळा, सह्याद्री सोसायटी, कदमवाडी, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, शिवाजी पार्क या भागातील नागरिकांना दैनंदिन होणारा पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
आज, शुक्रवारी ई-वॉर्डमधील कावळा नाका टाकीवरील भाग व कसबा बावडा परिसरात दैनंदिन होणारा पाणीपुरवठा अपुरा, कमी दाबाने तर काही ठिकाणी पाणीपुरवठाच होऊ शकणार नाही. या भागातील नागरिकांना दैनंदिन पिण्याच्या पाण्याची सोय होण्याच्या दृष्टीने महानगरपालिकेकडील उपलब्ध टँकरद्धारे पाणी वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.