कोल्हापूर : महानगरपालिका हद्दीत कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा अपुरा पुरवठा झाल्यामुळे बुधवारी नागरिकांना केंद्राबाहेर बराच वेळ ताटकळत उभे राहावे लागले. लस उपलब्ध न झाल्याने महापालिकेच्या शिवाजीपेठेतील फिरंगाई हॉस्पिटल आराेग्य केंद्र क्रमांक २ येथे आरोग्य कर्मचारी व नागरिक यांच्यात वादावादी झाली. बराच वेळ वाट पाहूनही लस मिळणार नाही म्हटल्यावर अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
गेल्या दोन दिवसांपासून जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयाकडून महानगरपालिकेला कमी प्रमाणात कोरोना प्रतिबंधात्मक लस मिळत आहे. पालिकेच्या अकरा केंद्रांवर रोज प्रत्येकी तीनशे नागरिकांचे लसीकरण करण्यात येते. त्यासाठी ३३०० ते ३५०० डोस रोज लागतात. नागरिकांचा लसीकरणास मोठा प्रतिसाद मिळत असल्याने नागरिकांची संख्या आणि डोसची संख्या यात तफावत निर्माण झाली आहे. मागणीपेक्षा डोस कमी मिळत आहेत.
शिवाजी पेठेतील फिरंगाई हॉस्पिटलमधील आरोग्य केंद्र क्रमांक २ येथे बुधवारी सकाळी नऊ वाजता जेव्हा लसीकरणास सुरुवात झाली तेव्हा रांगेत दीडशे ते पावणेदोनशे नागरिक थांबले होते. त्यावेळी आरोग्य केंद्राकडे १५० डोस शिल्लक होते. दरम्यानच्या काळात वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता भिसे यांनी सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडून डोस मागविले. एकीकडे रजिस्ट्रेशन तर दुसरीकडे लसीकरण सुरू होते. सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शिल्लक डोस संपले आणि फुले रुग्णालयातूनही डोस वेळेत आले नाहीत.
त्यामुळे प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांमधून चुळबुळ सुरू झाली. दोन अडीच तास रांगेत उभे राहूनही लस मिळत नाही म्हटल्यावर त्यांच्या राग अनावर झाला. त्यांनी आरोग्य कर्मचांऱ्याशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. डोस शिल्लक नाहीत तर आम्हाला आधी का सांगितले नाही, रांगेत उभे राहण्यास का सांगितले, अशा संतप्त सुरात विचारणा करण्यात येऊ लागली. वाद वाढत जाईल तसे रांगेतील काही नागरिक परत गेले. दुपारी दोननंतर १०० डोस उपलब्ध झाल्यानंतर पुन्हा लसीकरण सुरू झाले.
लस पुरवठा कमी झाला : पोळ
जिल्हा आरोग्याधिकारी कार्यालयाकडून गेल्या दोन दिवसांपासून लस पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे शहरातील काही केंद्रांवर अशी परिस्थिती उद्भवली. सायंकाळपासून पुरवठा सुरळीत होईल, असे सांगण्यात आले आहे. लस कमी असल्यामुळे थोडा त्रास होत असला तरी गुरुवारपासून पुरेशी लस उपलब्ध होईल, असे आरोग्याधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी सांगितले.
नागरिकांचा संताप स्वाभाविकच
सावित्रीबाई फुले रुग्णालयाकडून लस मिळेल, असे वाटल्याने आम्ही नागरिकांचे रजिस्ट्रेशन करून घेतले. लस संपल्यानंतर काही नागरिकांना थांबण्यास सांगितले. लस वेळेत उपलब्ध झाली नाही. ज्यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे, त्यांना गुरुवारी प्राधान्याने लस दिली जाईल, असे डॉ. योगिता भिसे यांनी सांगितले.
फोटो पाठवित आहे....................