कोल्हापूर : उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूक प्रचारादरम्यान माजी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याच्या निषेधार्थ आज, गुरूवारी येथील ताराराणी चौकात सर्व पक्षीय महिलांनी निदर्शने केली. काळ्या साडया परिधान करून त्यांनी निदर्शने केली. यावेळी महिलांनी एक रूपयांचा कडीपत्ता, मुन्ना झालेे बेपत्ता आदी घोषणा देवून लक्ष वेधले.सकाळी साडे दहाच्या सुमारास सर्व पक्षाच्या महिला ताराराणी चौकात एकत्र आल्या. त्यांनी माजी खासदार महाडिक यांच्या 'त्या' वक्तव्याचा निषेध नोंदवला. यावेळी ‘कोल्हापूर भाजपचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’, धिक्कार असो.. धिक्कार असो, मुन्नाचा धिक्कार असो, महिलांचा अपमान करणाऱ्या मुन्नाचा धिक्कार असो अशा घोषणा देवून परिसर दणाणून सोडला.यावेळी काँग्रेसच्या सरला पाटील, माजी महापौर निलोफर आजरेकर, शहराध्यक्ष सध्या घोटणे, शीतल तिवडे, वैशाली महाडिक, सुलोचना नायकवाडी, वनिता बेडेकर, जया उलपे, माधुरी लाड, हेमलता माने, सिंधू शिराळे, वैशाली जाधव, जयश्री चव्हाण, शोभा कवाळे आदी महिला उपस्थित होत्या.
महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्य: धनंजय महाडिक यांच्याविरोधात महिलांची निदर्शने
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 12:54 PM