कोल्हापूर : केंद्र सरकारच्या सहकार्याने शेतकऱ्यांना नागवून विमा कंपन्या मालामाल झाल्या असून शेतकरी मात्र कंगाल झाला आहे. सरकारने याबाबत शेतकऱ्यांना न्याय दिला नाहीतर आंदोलन उभे करू, असा इशारा कॉंग्रेसचे सचिव संजय पाटील यांनी पत्रकातून दिला आहे.
यापूर्वी झालेल्या राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या बैठकीत देशातील सर्वात मोठी सरकारी बँक, स्टेट बँक ऑफ इंडियाने विमा कंपन्या तकलादू कारणे देऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई नाकारत आहेत, असे पत्रच दिलेले आहे. तसेच बहुतांश विमा कंपन्या हेच करतात. एचडीएफसी बँकेने देखील यासंदर्भातील माहिती राज्य सरकार समोर आणून सरकारने यात हस्तक्षेप करावा असे म्हटले आहे. तसेच पीक विम्याचे हप्ते भरून घेतले पण नुकसानभरपाई दिली नाही त्या विमा हप्त्याची रक्कम तत्काळ परत देण्याची गरज होती. यावरून शेतकऱ्यांमध्ये किती असंतोष आहे, हे लक्षात येते.
यासाठी केंद्र सरकार आणि विमा कंपन्यांच्या विरोधात राज्यव्यापी आंदोलन केले जाणार असून त्यांच्या कचाट्यातून शेतकऱ्यांना सोडविण्यासाठी आंदोलन छेडू, असा इशारा संजय पाटील यांनी दिला आहे.