लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पगारदार खातेदारांना बँकेने ३० लाख रुपयांची विमा सुरक्षा योजना लागू केली आहे. अवघ्या ३०० रुपयांच्या हप्त्यात ही योजना सुरू केली असून, पहिल्या हप्त्यापोटी ६० लाखांचा धनादेश बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुक्रवारी विमा कंपनीकडे सुपुर्द करण्यात आला.
बँकेकडे बचत खाती असलेल्या विविध नोकरदार आणि पगारदार संघटनांनी बँकेकडे विमा सुरक्षा योजनेची मागणी केली होती. त्या मागणीचा विचार करीत बँकेने १७ हजार पगारदारांच्या विमा सुरक्षेपोटी ६० लाख रुपयांचा धनादेश कंपनीकडे दिला. उर्वरित १३ हजार पगारदारांच्या विम्यापोटीची रक्कम दुसऱ्या हप्त्यात १५ मार्चपर्यंत दिली जाणार आहे. बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ म्हणाले, धकाधकीच्या जीवनात अशी विमासुरक्षा आवश्यकच आहे. योजनेला पगारदाराकडून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. उर्वरित पगारदार खातेदारांनीही या योजनेचा तातडीने लाभ घ्यावा. यावेळी बँकेचे संचालक, विमा कंपनी व बँकेचे अधिकारी उपस्थित होते.
यांचा होणार समावेश
या पॉलिसीमध्ये शिक्षक, जिल्हा परिषद, पंचायत समिती, आरोग्य विभागाचे कर्मचारी, साखर कारखान्याचे कामगार, ग्रामपंचायतींचे कर्मचारी, विकास संस्थांचे सचिव, बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
असा मिळणार लाभ
योजनेत समाविष्ट विमाधारकाचा अपघाती मृत्यू झाल्यास अगर कायमचे अपंगत्व आल्यास ३० लाख रुपयांची विमा भरपाई मिळणार आहे. एक अवयव निकामी झाल्यास अगर ५० टक्के अपंगत्व आल्यास १५ लाख रुपये विमा भरपाई मिळणार आहे. विमाधारकाच्या दोन अपत्यांना पन्नास हजारांपर्यंत शैक्षणिक मदतही मिळणार असल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले.
फोटो ओळी : जिल्हा बँकेने पगारदार खातेदारांना विमा योजना लागू केली आहे. विम्याचा पहिल्या हप्त्याचा धनादेश बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ याच्या हस्ते विमा कंपनीचे रूद्राशिष रॉय यांच्याकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी बँकेचे अधिधकारी, संचालक उपस्थित होते. (फोटो-२६०२२०२१-कोल-केडीसीसी)