कोल्हापूर : कोल्हापुरातील पत्रकारांचे जीवन सुखी, सुरक्षित होण्यासाठी त्यांना विमा संरक्षण लागू करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक पत्रकाराच्या नावे साडेचार हजार रुपयांची एकरकमी ठेव ठेवून त्यातून या विम्याचे हप्ते भरले जातील. याकरिता लोकप्रतिनिधी, दानशूर व्यक्ती-संस्थांनी योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी रविवारी येथे केले.येथील कोल्हापूर प्रेस क्लबच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन, बोधचिन्हाचे अनावरण व दूरध्वनी क्रमांकाच्या डायरी प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती, तर महापौर हसिना फरास, खासदार राजू शेट्टी, धनंजय महाडिक, संभाजीराजे छत्रपती, आमदार हसन मुश्रीफ, सतेज पाटील, चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, उपमहापौर अर्जुन माने, महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, स्थायी समिती सभापती संदीप नेजदार प्रमुख उपस्थित होते. पालकमंत्री पाटील म्हणाले, कोल्हापूरला पत्रकारितेची मोठी परंपरा आहे. येथील पत्रकारांचे गेल्या २३ वर्षांपासूनचे स्वप्न असलेल्या प्रेस क्लबचे कार्यालय आज साकारले आहे. त्यासाठी योगदान देणारे लोकप्रतिनिधी, महापालिकेचे आभार मानतो. कोल्हापुरातील पत्रकारांसाठी गृहनिर्माण संस्था, निवृत्तिवेतनासाठी शासनदरबारी पाठपुरावा केला जाईल. शाहू छत्रपती म्हणाले, पत्रकारांसाठी हे नूतन कार्यालय उपयुक्त ठरणार आहे. या कार्यक्रमात पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते प्रेस क्लबच्या कार्यालयाचे उद्घाटन आणि बोधचिन्हाचे अनावरण केले. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते डायरीचे प्रकाशन झाले. कार्यालय साकारण्यासाठी मदतीचा हात देणारे पालकमंत्री पाटील, महापौर फरास, आयुक्त शिवशंकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, महापालिका कामगार संघाचे नेते रमेश देसाई, ‘निर्मिती’चे अनंत खासबारदार, आर्किटेक्ट आशुतोष केसकर, बांधकाम व्यावसायिक मनोज मेहता यांचा सत्कार कार्यकारिणीतर्फे करण्यात आला. प्रेस क्लबचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी प्रास्ताविकात प्रेस क्लबची वाटचाल, कार्यालय उभारणीचा आढावा घेतला. कोल्हापुरातील पत्रकारांसाठी गृहनिर्माण संस्थेबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी त्यांनी केली. समीर देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. त्यात त्यांनी पत्रकारांना निवृत्तिवेतन लागू करण्याची मागणी केली. उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थितीया कार्यक्रमास ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, ‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पवार, कार्यकारी संपादक मनोज साळुंखे, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोंढे, ‘तरुण भारत’चे निवासी संपादक जयसिंग पाटील, पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. जे. एफ. पाटील, ज्येष्ठ चित्रकार श्यामकांत जाधव, दळवीज् आर्टस्चे प्राचार्य अजेय दळवी, विजय टिपुगडे, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, भाजपचे जिल्हा संघटक बाबा देसाई, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सदस्य सुभाष वोरा, संगीता खाडे, जिल्हा परिषदेच्या सदस्या रोहिणी आबिटकर, माजी सदस्य प्रा. अर्जुन आबिटकर, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, माजी महापौर आर. के. पोवार, कॉ. दिलीप पोवार, दिलीप देसाई, प्रसाद जाधव, उदय लाड, अजित सासने, बाबा इंदुलकर, काँग्रेस जिल्हा सरचिटणीस एस. के. माळी, आदी उपस्थित होते.धनंजय महाडिकांकडून १ लाखांचा निधीकार्यक्रमात खासदार धनंजय महाडिक यांनी प्रेस क्लबसाठी १ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. नूतन कार्यालयाशेजारी असलेल्या अन्य दोन खोल्या प्रेस क्लबला देण्यात येतील, असे आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांनी, तर या खोल्यांचे नूतनीकरण करून देण्याचे आश्वासन पालकमंत्री पाटील यांनी दिले. कृषी महाविद्यालयातील निवृत्त कर्मचारी अरुणकुमार पोतदार यांनी २१ हजार रुपयांच्या देणगीचा धनादेश अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.
कोल्हापुरातील पत्रकारांना विमा संरक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2017 12:45 AM