कोल्हापूर : केंद्र व राज्यात भाजपची शिवसेनेशी युती असताना कोल्हापूर महापालिकेत मात्र ताराराणी आघाडीशी युती करणाऱ्या पालकमंत्र्यांची बौद्धिक दिवाळखोरीच असल्याचा पलटवार शिवसेनेने बुधवारी केला. आरक्षण बदलण्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप करणाऱ्या शिवसेनेवर मंगळवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी टीका केली होती. त्यास शिवसेना शहर कार्यालयात झालेल्या बैठकीत प्रत्युत्तर देण्यात आले. प्रा. विजय कुलकर्णी म्हणाले, ‘आरक्षण सोडत नव्याने करण्यामध्ये नक्कीच राजकीय हस्तक्षेपाचा संशय असून, त्यास कोल्हापूरची जनताच चोख उत्तर देईल. पावसाळ्यात बेडूक ‘डराँव-डराँव’ करतात, पण त्यांचा आवाज पावसाळ््यापुरताच असतो. त्यामुळे निवडणुकीमध्ये तथ्यहीन टीकेद्वारे असा ‘डराँव-डराँव’ करण्याचा प्रयत्न ‘बालक’मंत्र्यांच्या बेडकांनी करू नये. निवडणुकीत कुठल्या तरी आघाडीच्या पाठबळावर डबक्यातला बेडूक कितीही फुगला तरी तो शिवसेनेच्या वाघाशी सामना करू शकत नाही. भ्रष्टाचारी काँग्रेसच्या हातात हात देऊन तुम्ही कोल्हापूरकरांचा विश्वासघात केला असून, आर. डी. पाटील खरोखर तुम्ही मान्य केले की भाजपला कावीळ झाली आहे. त्यामुळे व्यवस्थित उपचार घ्या. शिवाजी जाधव म्हणाले, ‘पांढरे कपडे घालून सभ्यतेचा बुरखा पांघरूण ‘खाली मुंडी, पाताळ धुंडी’ असणाऱ्या लबाड नगरसेवकाला त्याचा मूळचा देशी दारूविक्रीचा होलसेल व्यवसाय पूर्णवेळ करण्यासाठी स्वाभिमानी जनता कायमची घरात बसविणार आहे.’ शहरप्रमुख दुर्गेश लिंग्रस म्हणाले, ‘अचानक मिळालेल्या मंत्रिपदामुळे भांबावलेल्या पालकमंत्र्यांना बोगस डिग्री, चिक्की घोटाळा यासह कमी काळात केलेल्या ‘एक भाजपच्या बारा भानगडी’ दिसत नाहीत काय..? पालकमंत्र्यांचे नव्याचे नऊ दिवस असून, पालकमंत्री म्हणजे ‘घोषणामंत्री’ आहेत.’ ‘अय्या गडे.. इश्श गडे.. कुणाचा हा ‘रामुगडे’? पालकमंत्र्यांच्या घराजवळील नगरसेवकाची परत निवडून येण्याची खात्री नसल्यामुळे त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. ‘अय्या गडे.. इश्श गडे... कुणाचा हा ‘रामुगडे’? या महाशयांनी आपल्या औकातीमध्ये राहून तोंडाला आवर घालावा, अन्यथा त्यांना धडा शिकवू, असा इशारा माजी उपमहापौर उदय पोवार यांनी दिला.
‘बालक’मंत्र्यांची बौद्धिक दिवाळखोरी
By admin | Published: August 06, 2015 1:01 AM