आजरा पोलीस वसाहतीच्या झालेल्या दुरावस्थेबाबत मनसेने यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. मात्र, यावर अद्यापही कोणतीही कारवाई केली नाही. याचा निषेध व्यक्त करीत मनसेने गुरुवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
मोर्चामध्ये आजरा पोलीस वसाहतीची डागडुजी तातडीने करावी, पोलीस वसाहतीच्या खोल्यांमध्ये नवीन प्लास्टर करावे, पोलीस वसाहतीच्या परिसराची दैनंदिन साफसफाई करावी, तालुक्याला लाभलेल्या तीन आमदारांनी पोलीस वसाहतीचे नूतनीकरण करण्यासाठी प्रयत्न करून सुसज्ज अशी नवीन इमारत उभी करावी, अशा मागण्याही या वेळी करण्यात आल्या.
याबाबत १५ दिवसांत पूर्तता न झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोल्हापूर कार्यालयासमोर मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला.
मोर्चात जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले, तालुकाध्यक्ष अनिल निऊंगरे यांसह मनसे कार्यकर्ते सहभागी झाले होते.