पन्हाळा : जाती व्यवस्थेमुळे भारतीय समाजाचे अतोनात नुकसान झाले आहे. भारतातून जातींच्या उच्चाटनासाठी आजच्या काळात आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कम्युनिस्ट विचारवंत प्रा. डॉ. आनंद मेणसे यांनी केले. श्रमिक प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने पन्हाळा येथील संजीवन इंजिनिअरिंग महाविद्यालयात आयोजित तीन दिवसीय राज्यस्तरीय कॉम्रेड गोविंद पानसरे युवाजागर शिबिरात ‘जात वास्तव आणि विद्रोही परंपरा’ या विषयावर ते बोलत जाते.
देशातील जाती व्यवस्थेचा परिचय करून देताना डॉ. मेणसे म्हणाले की, भारतीय समाज आजही जाती व्यवस्थेने तयार केलेल्या रुढी-परंपरा सोडायला तयार नाही. आजसुद्धा शहरात जात समूहाच्या अपार्टमेंट उभारल्या जात आहेत, हे भयानक आहे. जातीच्या उतरंडीमुळे समाजात खालच्या स्तरावर असणाऱ्या जात समूहांचे मोठ्या प्रमाणात शोषण होते. जाती व्यवस्थेच्या विरोधात१२ व्या शतकात विद्रोह करणारे बसवेश्वर हे कृतिशील विचारवंत होते. त्यांनी ‘अनुभवमंटप’ संकल्पनेच्या माध्यमातून सर्व जातींच्या लोकांना एकत्र आणले. इतकेच नव्हे, तर १२ व्या शतकात आंतरजातीय विवाह घडवून आणला. पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महात्मा गांधींनीही जातीच्या उच्चाटनासाठी आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला असून, त्यांच्या विचारांची अंमलबजावणी आजच्या काळातही करणे गरजेचे आहे.
विशिष्ट विचारसरणीचे सरकार सत्तेवर येऊन आठवडा होत नाही तोवर आता समाजमाध्यमांतून सतीप्रथेचे उदात्तीकरण सुरू झाले आहे. आरक्षण रद्द करण्याची मागणीही जोरकसपणे येऊ लागली आहे; पण मागास जातींच्या उत्थानासाठी शिक्षण, नोकऱ्यांमध्ये आरक्षण गरजेचे आहे, असेही मत त्यांनी व्यक्त केले.शनिवारी शिबिराच्या दुसºया दिवशी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते शेखर सोनाळकर यांनी ‘भारताचा स्वातंत्र्यलढा, बहुविधता व धर्मनिरपेक्षता’ या विषयावर, प्रसिद्ध कवी, अनुवादक गणेश विसपुते यांनी ‘कला, साहित्य, संस्कृती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या विषयावर, विद्रोही कवी वाहरू सोनवणे यांनी ‘आदिवासी संस्कृती व भारत’, ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांनी ‘लोकसंस्कृती व भारत’ या विषयावर आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक दिलीप बोरकर यांनी ‘गोवन संस्कृती’ या विषयावर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी काश्मीर प्रश्नांचे अभ्यासक जतीन देसाई, लेखिकाप्रा. श्रुती तांबे, वसुधा पवार, प्रा. डॉ. मेघा पानसरे, आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ. मंजुश्री पवार यांनी स्वागत व प्रास्तविक केले. सुशील लाड यांनी आभार मानले.
पन्हाळा येथे कॉम्रेड गोविंद पानसरे युवाजागर शिबिरात ज्येष्ठ कम्युनिस्ट विचारवंत प्रा. डॉ. आनंद मेणसे यांनी मार्गदर्शन केले.