कोल्हापूर: शिक्षण सभापती व समितीला अंधारात ठेवून आंतरजिल्हा बदली झालेल्या ४० शिक्षकांच्या कार्यमुक्तीस शिक्षण समितीने ठरावाद्वारे स्थगिती दिली. जिल्ह्यात येणारे शिक्षक हजर झाल्याशिवाय येथून जाणाऱ्या शिक्षकांना अजिबात कार्यमुक्त करू नका, अशा सक्त सूचना शिक्षण सभापती प्रवीण यादव यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या.जिल्हा परिषदेची प्राथमिक शिक्षण समितीची बैठक शुक्रवारी दुपारी समिती सभागृहात झाली. सभापती प्रवीण यादव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सदस्य भगवान पाटील, रसिका पाटील, स्मिता शेंडुरे यांनी प्रत्यक्षरीत्या, तर विनय पाटील, वंदना जाधव, अनिता चौगुले, प्रियांका पाटील यांच्यासह सर्व गटशिक्षणाधिकाऱ्यांनी ऑनलाईन सहभाग घेतला.शिक्षक बदलीच्या निर्णयाबद्दल सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करताना जिल्ह्यातील शिक्षकांची रिक्त पदे विचारात न घेता अशाप्रकारे कार्यवाही करणे म्हणजे जिल्ह्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा करण्यासारखेच आहे. आता शिक्षक सोडल्यास येत्या काही दिवसांत शाळा सुरू कण्याचा निर्णय शासनाने घेतल्यास शिक्षक उपलब्ध होणार नाहीत, अशी भीती व्यक्त केली.
जिल्ह्यात सुरू असलेल्या ऑनलाईन शिक्षणाची स्वत: समितीसह सभापती प्रत्यक्ष जाऊन पाहणी करतील, असेही ठरले. शाळांमधील पटसंख्या वाढवण्यासाठी या महिनाअखेरपर्यंत शिक्षकांनी पालकभेट घ्यावी, असेही ठरले.शिंगणापूरप्रकरणी ग्राहक न्यायालयात जाणारशिंगणापूर क्रीडा प्रशालेतील निकृष्ट मॅटप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद झाला असला तरी यात जिल्हा परिषदेची फसवणूक झाली असल्याने रक्कम वसूल करण्यासाठी ठेकेदाराविरोधात ग्राहक न्यायालयात दावा दाखल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.चौकशी अहवालानंतर कारवाईशिंगणापूर प्रशालेत कोविड काळात प्रशिक्षण दिल्याप्रकरणी क्रीडा शिक्षकाची चौकशी करून अहवाल देण्यास सांगण्यात आले होते, पण मुख्याध्यापकांनी अद्याप चौकशी अपूर्ण असल्याचे सांगितले. हा अहवाल आल्यानंतर कारवाई करण्याचा निर्णयही सर्वानुमते घेण्यात आला.