कोल्हापूर : महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील अधिकाऱ्यांच्या चर्चेतून आलेल्या सामाईक समस्या राज्यस्तरावरून सोडविण्याबाबत त्या त्या शासनांना कळविण्याच्या सूचना महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी शुक्रवारी दिल्या. सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाने समन्वय वाढविण्यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.
सीमावर्ती भागातील जिल्ह्यांच्या आंतरराज्यीय सामाईक मुद्द्यांबाबत कोल्हापुरात दोन्ही राज्यांची समन्वय बैठक दोन्ही राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, उस्मानाबाद, सोलापूर आणि लातूर हे पाच तर कर्नाटकातील चार जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित होते.
कोश्यारी यांनी ही समन्वय बैठक लाभदायक ठरेल, असेही सूचित केले. गेहलोत यांनी सर्वांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या. बैठकीत सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांच्या सादरीकरणाचे प्रस्ताव दोन्ही राजभवनकडे पाठवावेत, असे दोन्ही राज्यपालांनी सांगितले.
दोन्ही भाषांत दिशादर्शक फलक
दोन्ही राज्यांच्या सीमा भागात मराठी आणि कन्नड भाषकांच्या सोयीसाठी दोन्ही भाषांत दिशादर्शक फलक करण्यासह काही सामाईक मुद्यांवर समन्वय बैठकीत चर्चेनंतर एकमत झाले.
जत-अक्कलकोटला पाणी सोडा
सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी म्हणाले की, २०१६-१७ मध्ये महाराष्ट्र राज्याने कर्नाटक राज्यातील अवर्षणप्रवण भागासाठी ६.८६५ टीएमसी पाणी सोडले होते, त्याप्रमाणे कर्नाटक शासनाने महाराष्ट्र राज्यातील जत व अक्कलकोट भागासाठी पाणी सोडावे.
अलमट्टीची पाणीपातळी मर्यादित ठेवा
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी कृष्णा नदीतील पुराचे पाणी बाहेर काढण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंत अलमट्टी धरणातील पाण्याची पातळी ५१७ ते ५१७.५० मीटरच्या मर्यादेत राखावी अशी विनंती केली.
सीमावर्ती भागातील गुन्हेगारी रोखण्यावर भर
आंतरराज्य समन्वय बैठकीत परस्परांच्या सहकार्याने मुख्यत: गुन्हेगारी रोखण्यावर भर देण्यात आला. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांत चांगला समन्वय असेल तर अनेक प्रश्नांची सोडवणूक करणे शक्य असल्याचा विश्वास बैठकीत व्यक्त झाला.
भारत वाघमारे (उपजिल्हाधिकारी, सोलापूर) : बेकायदेशीरमोलॅसिस उचलले जाते त्या कारखान्यात तपासणीसाठी सहज प्रवेश करणे, तसेच अवैध दारूविक्री, मोलॅसिस गुन्ह्यासंदर्भात दोन्ही राज्यांतील अधिकाऱ्यांमध्ये समन्वय व संयुक्तरीत्या छापेमारी आवश्यकता आहे.
सचिन ओंबासे (उस्मानाबाद) : कलबुर्गी येथील बेकायदेशीर लिंगनिदानबाबतच्या ऑनलाइन तक्रारीसह स्टिंग ऑपरेशनप्रमाणेच बेकायदेशीर लिंगनिदान करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. गुटखा, पानमसाला व अनुषंगिक अन्य बाबींवर महाराष्ट्राप्रमाणे कर्नाटकनेही निर्बंध घालावेत.
पृथ्वीराज बी. पी. (लातूर) : कारंजा धरणातून पाणी सोडून ते बिदर जिल्ह्यातील चंद्रपूर बॅरेजपर्यंत नेण्यासाठी सिंधीकामठ केटिवेअरचे गेट्स काढणे, बसविणे याबाबतची थकबाकी, तसेच या पाण्याचा वापर करणाऱ्या कर्नाटकातील शेतकऱ्यांची थकबाकी द्यावी.वाळू उत्खनन, स्वातंत्र्यसैनिकांच्या नोंदी, याबाबत माहितीची देवाणघेवाण करावी.