कोल्हापूर : चिल्लर पार्टी विद्यार्थी चळवळ आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळामार्फत रविवार, दि. १७ सप्टेंबरला साळोखेनगर येथील कोपार्डेकर शाळेत एक दिवसाची मोफत संवाद लेखन, अभिनय आणि सादरीकरण या विषयावर कार्यशाळा घेण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या निवडक ११ शाळांतील विद्यार्थ्यांना या कार्यशाळेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.
महानगरपालिकेतील मुलांमध्ये नाटकांची आवड जोपासण्यासाठी ‘चिल्लर पार्टी’तर्फे ही कार्यशाळा घेण्यात येणार आहे. संपूर्ण नाटक सादर करण्याऐवजी पात्रांची कमी संख्या आणि व्यासपीठाचा कमीत कमी वापर करून सादर करण्यात येणाºया दहा मिनिटांपर्यंतच्या स्किटच्या माध्यमातून सादरीकरण अलीकडे करण्यात येते. हे स्किट कसे लिहावे, त्याचे प्रभावी सादरीकरण कसे करावे आणि अभिनय कसा करावा या अनुषंगाने या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
असे आहे कार्यशाळेचे स्वरुप
या कार्यशाळेचे उद्घाटन कोल्हापूर महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळाच्या सभापती वनिता अशोक देठे यांच्या हस्ते करण्यात येणार असून प्रशासन अधिकारी विश्वास सुतार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तीन सत्रांत ही कार्यशाळा होणार असून सकाळी १० वाजता सुरू होणाºया सत्रात उद्घाटन समारंभात कार्यशाळेच्या हेतूची माहिती देण्यात येणार आहे. दुसºया सत्रात प्रा. टी. आर. गुरव हे ‘संवाद लेखन’ या विषयावर तर ‘अभिनय कला’ या विषयावर संजय हळदीकर तिसºया सत्रात मार्गदर्शन करणार आहेत. दुपारच्या सत्रात सादरीकरण या विषयावर संजय तोडकर हे मार्गदर्शन करणार असून शेवटच्या समारोपाच्या सत्रात प्रत्यक्ष सहभागी विद्यार्थी संवाद अभिप्राय लेखन करणार आहेत.
पाठ्यपुस्तकातील धड्यांच्या आधारावर पूर्वतयारी
या कार्यशाळेत सहभागी होणाºया इयत्ता पाचवी, सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांकडून त्या-त्या शाळेतील शिक्षक मराठीच्या पाठ्यपुस्तकातील धड्यांच्या आधारावर पूर्वतयारी करून घेणार आहेत. या कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांकडून छोट्या-छोट्या संवाद प्रक्रियेवरील लिखाण आणि अभिनय तसेच सादरीकरण यावर भर देण्यात येणार आहे. याशिवाय संबंधित विद्यार्थ्यांनी बसविलेल्या छोट्या-छोट्या स्किटचे सादरीकरण करण्यासाठी महिन्याचा अवधी देण्यात येणार आहे. त्यानंतर एका कार्यक्रमात हे स्किट प्रत्यक्ष सादर करण्यात येणार आहे. यासाठी चिल्लर पार्टीचे सदस्य या विद्यार्थ्यांना मदत करणार आहेत. स्कीटसाठी पाठ्यपुस्तकातीलच पाठ्यांश निवडल्यामुळे करमणुकीतून अभ्यास कसा करावा याचेही ज्ञान मुलांना मिळणार आहे.