कोल्हापूर : रिझर्व्ह बँकेेने जाहीर केलेल्या द्वैमासिक पतधाेरणात कोणत्याही प्रमुख व्याजदरात बदल केला नसल्याची माहिती बँकिंग तज्ज्ञ किरण कर्नाड यांनी पत्रकातून दिली.
'गेल्या वर्षीच्या आर्थिक वर्षात जीडीपी १०.५ टक्याने वाढण्याचे उद्दिष्ट ठेवले असले तरी प्रत्यक्षात वाढ झाली नव्हती. यामुळे रिझर्व्ह बँकेने आता काही आर्थिक निकषात बदल केलेले आहेत. परिणामी या वर्षीच्या जीडीपीचे उद्दिष्ट आता १०.५ टक्क्यांवरून ९.५ टक्के असे कमी केलेले आहे. सूक्ष्म, लहान आणि मध्यम उद्योग धंद्याना आता व्यवसायासाठी वर्षभरात बँकांकडून सुमारे १५ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. गेल्या आणि या वर्षी कोरोना काळात होरपळलेल्या कर्जदारांना आता दिलासा देण्यासाठी बँकांना आपली ५० कोटीपर्यंत असलेली कर्जांची पूनर्बांधणी करता येणार आहे. यापूर्वी ही मर्यादा २५ कोटीपर्यंतच होती. यामुळे आता एनपीएचे प्रमाण वाढणार नाही.
ही अर्थव्यवस्था सावरण्यासाठी रिझर्व्ह बँक आपल्या अतिरिक्त निधीतील ९९१२२ कोटी रुपये आता केंद्र सरकारला देणार आहे. अर्थव्यवस्था सावरण्याचा आणखी एक महत्त्वाचा उपाय म्हणून रिझर्व्ह बँकेने आपला रेपो रेट आता ४ टक्केवरच स्थिर ठेवला आहे. तर रिव्हर्स रेपो रेटही ३.३५ टक्क्यांवर ठेवल्याचे कर्नाड यांनी पत्रकात म्हटले आहे.