आयुब मुल्ला ल्ल खोचीआंतरजिल्हा बदली प्रक्रियेत सर्व्हर डाऊनमुळे आॅनलाईन पद्धतच खोळंबली आहे. त्यामुळे काठावरच्या आॅनलाईन अर्ज नोंदणीचा बट्ट्याबोळ झाला आहे. आज १ मे ही अंतिम तारीख असल्याने बदली व्हावी यासाठी धडपडणाऱ्या शिक्षकांची धाकधूक वाढली आहे. सर्व्हर डाऊनची दखल प्रशासनाने घेतली आहे; परंतु यास मुदतवाढ मिळेल का? याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा पातळीवरच आंतरजिल्हा बदलीची प्रक्रिया होणार होती; परंतु राज्य शासनाने राज्य पातळीवरून आंतरजिल्हा बदली करण्याचे धोरण जाहीर केले. त्यामुळे पुन्हा कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार सुरु झाला. पूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव दाखल केलेल्या शिक्षकांना आॅनलाईन माहिती भरणे अनिवार्य करण्यात आले. त्यानुसार २८ एप्रिल ते १ मे पर्यंतची मुदत देण्यात आली. त्यानुसार ‘एज्युस्टाफ महाराष्ट्र गव्हर्न्मेंट’ या वेबसाइटवर आॅनलाईन अर्ज भरण्यास जिल्ह्यात सुरुवात झाली, पण ही वेबसाईटच संथ आहे. सर्व्हर सतत डाऊन होऊ लागला आहे. त्यामुळे मुदतपूर्व अर्ज भरतील का याची धाकधूक शिक्षकांच्यात वाढली आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेत सध्या रोस्टर तपासणीचे काम अंतिम टप्प्यात आहे. गत जुलैपासून हे काम सुरू आहे. जातपडताळणी दाखला, नावात बदल अशी वैयक्तिक कागदपत्रांची पूर्तता करण्यास शिक्षकवर्गाकडून विलंब होत असल्याने रोस्टरला अंतिम रूप देणे अडचणीचे झाले आहे. आज, सोमवारी सुटी असली तरी हे काम तसेच आॅनलाईन अर्ज भरण्याचे काम सुरू ठेवले जाणार आहे. पण खरा प्रश्न तो आॅनलाईन प्रक्रिया सुरळीत राहणार का याचा आहे. कारण अर्ज भरण्याची अंतिम मुदत १ मे पर्यंत आहे. त्यावरूनच शिक्षकवर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. या प्रक्रियेस मुदतवाढ मिळेल असे संकेत मिळाल्याची चर्चा आहे, पण ठोस माहिती नाही. तरीसुद्धा सतत अर्ज कसा भरता येईल याच प्रयत्नात शिक्षक आहेत. ही क्रिया सुरळीत झाली तरच पुढील सर्व क्रिया वेळेत होण्यास मदत होईल, अन्यथा शिक्षण विभागाची प्रचंड दमछाक होईल. आलेल्या अर्जांचे एकत्रीकरण करून सेवाज्येष्ठता यादी, रिक्त जागा व रोस्टर याचा आधार घेऊन १५ मे पर्यंत राज्यपातळीवरून बदल्यांचे आदेश होणार आहेत. त्याच दिवशी बदली झालेल्या शिक्षकाने मुख्यालयात हजर व्हावयाचे आहे. त्यानंतर ३१ मे पर्यंत जिल्हाअंतर्गत झालेल्या बदलीच्या ठिकाणी हजर होणे बंधनकारक आहे.
आंतरजिल्हा बदलीचा आॅनलाईन खोळंबा
By admin | Published: April 30, 2017 11:55 PM