पोपट पवार कोल्हापूर : कोल्हापूरच्या क्रीडानगरीला साजेसे असे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम उभारण्यासाठी विकासवाडी (ता. करवीर) येथील एमआयडीसीची १२ हेक्टर जागा देण्याचा चांगला निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला असला, तरी ही जागा अद्यापही महसूल विभागाकडेच असल्याने तिचे एमआयडीसीकडे हस्तांतर कधी करणार, असा सवाल कीडाप्रेमींमधून उपस्थित होत आहे.जोपर्यंत ही जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित होत नाही, तोपर्यंत स्टेडियम उभारणीत अडचणी आहेत. कोल्हापूर क्रिकेट असोसिशयनने ही जागेची अडचण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्याची गरज आहे. आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. त्यामुळे एकदा आचारसंहिता जाहीर झाल्यावर विषय मागे पडू शकतो.कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी विकासवाडी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यातील १२ हेक्टर जागा क्रीडा विभागाला हस्तांतरित करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि.३) दिले होते. मात्र, ही जागाच अद्याप एमआयडीसीकडे नाही, तर ती क्रीडा विभागाला हस्तांतरित कशी करणार हा प्रश्न आहे. नेर्ली-विकासवाडी गावच्या हद्दीतील १११, ११२ व ११३ गट नंबरची १२ हेक्टर जागा सध्या महसूल विभागाच्या ताब्यात आहे.मात्र, या जागेसह येथील अन्य जागांवर मालकी हक्कात एमआयडीसीचे शिक्के पडले आहेत. जोपर्यंत महसूल विभाग एमआयडीसीकडे ही जागा वर्ग करत नाही, तोपर्यंत एमआयडीसीला ती क्रीडा विभागाला देता येणार नाही. कोल्हापूर क्रिकेट असोसिएशन (केसीए) या स्टेडियमचा आर्थिक भार उचलणार असून, जागा हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने झाली, तरच केसीएला जागेचा विचार लक्षात घेत स्टेडियमचे नियोजन करता येणार आहे. त्यामुळे महसूलने ही जागा तत्परतेने एमआयडीसीकडे वर्ग करणे गरजेचे बनले आहे.
आयटी पार्कसारखा अनुभव नकोकोल्हापुरात आयटी पार्कसाठी शेंडा पार्कातील कृषी विभागाची ३५ हेक्टर जागा एमआयडीसीकडे वर्ग करण्याचा निर्णय होऊन वर्ष उलटले. मात्र, अद्यापही ही जागा एमआयडीसीकडे वर्ग झालेली नाही. प्रशासन केवळ कागदी घोडे नाचवत असल्याने आयटी पार्कचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. आता स्टेडियमच्या बाबतीतही ही दिरंगाई होऊ नये, अशी अपेक्षा क्रीडाप्रेमी व्यक्त करत आहेत. शाहू मिलमधील २७ एकर जागेचाही घोळ तसाच सुरू आहे. ही जागा वस्त्रोद्योग महामंडळाकडून अद्याप शासनाकडे हस्तांतरितच झालेली नाही. शासन ती कोल्हापूर महापालिकेकडे विकसनासाठी देणार होते. परंतु, मूळ प्रक्रियाच अजून झालेली नाही, कारण त्याचा रीतसर प्रस्तावच सादर झालेला नाही.
स्थानिकांचा होतोय विरोधनेर्ली विकासवाडी येथे राज्य सरकारने एमआयडीसी घोषित केली आहे. येथील जमिनीच्या मालकी हक्कात एमआयडीसीने शिक्के मारल्याने आधी ते शिक्के काढा, मगच स्टेडियम उभारा, अशी स्थानिकांची मागणी आहे. आमचा विराेध स्टेडियमला नसून, प्रस्तावित एमआयडीसीसाठी केल्या जाणाऱ्या भूसंपादनाला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
विकासवाडी येथील प्रस्तावित स्टेडियमसाठी दिलेली जागा महसूल विभागाकडे आहे. महसूल विभागाकडून जागा हस्तांतरित केल्याचे पत्र आम्हाला आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. - उमेश देशमुख, प्रादेशिक अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळ, कोल्हापूर विभाग.