कोल्हापूर : मानवजातीच्या उद्धारासाठी कुंडलिनी जागृतीच्या माध्यमातून करोडो लोकांना आत्मसाक्षात्कार देणाऱ्या परमपूज्य श्री माताजी निर्मलादेवी यांच्या हजारो सहजयोग साधकांच्या आंतरराष्ट्रीय श्री महालक्ष्मी पूजा महोत्सवास देशासह परदेशातील १0 हजारांहून भक्तांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला.
मुस्कान लॉन येथे श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट पुणेतर्फे शुक्रवारपासून सुरू झालेल्या महोत्सवात सकाळी होमहवन, सहजयोग साधकांची कार्यशाळा झाली. सायंकाळच्या प्रहरात कुंडलिनी चढविणे व बंधन घेणे यासह तीन महामंत्राने सुरुवात झाली. दरम्यान मेहंदी कार्यक्रमाबरोबरच‘महाराष्ट्र देशा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम राज्यातील ११ जिल्ह्यांतून आलेल्या ३०१ कलाकारांनी सादर केला. यात महाराष्ट्रातील संत, महात्म्य, सांस्कृतिक परंपरा, गीत, आदींचा समावेश असलेली सांगितीक महानाट्य सादर केले. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्रतिष्ठितांचा ट्रस्टतर्फे गौरव करण्यात आला.
यावेळी विशेष उपस्थितीमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, आदी मान्यवर उपस्थित होते. १६ ते १८ नोव्हेंबर दरम्यान आयोजित केलेल्या या महोत्सवात महालक्ष्मी पूजा, सहजयोग ध्यान शिबिर, सहजयोग पद्धतीने सामुदायिक विवाह सोहळा, आदी कार्यक्रम होतील. विशेषत: मनुष्याच्या जीवनामध्ये ताणतणाव पूर्णपणे जाऊन त्यांना सुखशांती व आंतरिक परिवर्तन त्यांच्यातील सर्व प्रकारची व्यसने समूळ नष्ट होऊन एक नवीन ऊर्जा प्राप्त व्हावी. या उद्देशाने सर्व प्रकारच्या ध्यानपद्धती प्रात्यक्षिकांसह सर्वांना दिल्या जाणार आहेत.श्री माताजी निर्मलादेवी सहजयोग ट्रस्ट (पुणे) व कोल्हापुरातील परिवारातर्फे मुस्कान लॉन येथे शुक्रवारी सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय महालक्ष्मी पूजा व ध्यान शिबिरात सायंकाळी ‘महाराष्ट्र देशा ’हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. तसेच पूजा व ध्यान शिबिरास सुरुवात झाली. यात राज्यासह परदेशातील हजारो भक्तांनी सहभाग घेतला.