कोल्हापूर : जगभरातील ५०हून अधिक उच्च प्रतीचे ब्रॅण्ड्सचे विविध प्रकारचे दोन हजाराहून अधिक पेनांचे तसेच उच्च दर्जाची शाई, पेन ठेवण्यासाठी खास पाऊच आणि केसेस अशा विविध गोष्टींचा समावेश असलेला दोन दिवसांचा आंतरराष्ट्रीय पेन शो 'बॉब ॲन्ड ची' च्या वतीने उद्या, शनिवार दि. २५ आणि रविवार, दि. २६ मे रोजी हॉटेल सयाजी येथे आयोजित केलेला आहे.हा शो सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुला असून २०० रुपयांपासून रुपयांपासून ५.५ लाख पर्यंतची पेन विक्रीसाठी येथे उपलब्ध होणार आहेत. या दोन दिवसात पेन शोला भेट देणाऱ्या निवडक कोल्हापूरकरांना लकी ड्रॉ द्वारे प्रीमियम पेन भेट दिली जाणार आहेत, असे 'बॉब ॲन्ड ची'च्या संचालिका प्राची वाघ यांनी सांगितले. डी. वाय पाटील एजुकेशन सोसायटीचे कुलपती आणि अध्यक्ष डॉ. संजय डी पाटील, सिनर्जी ग्रीन इंडस्ट्रिज लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष सचिन शिरगांवकर, अर्किटेक्ट शिरीष बेरी, प्रसाद कामत यांच्या उपस्थितीत आज, सकाळी ११.३० वाजता या पेन शो चे उदघाटन होणार आहे.विविध ब्रॅण्ड्ससह पुण्यातील प्रसिद्ध व्हीनस ट्रेडर्स यांचे पु. ल. देशपांडे, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सिग्नेचर फाउंटन पेन, शिवाजी महाराज पेन आणि लहान मुलांसाठी चिंटू पेन या प्रदर्शनाचे आकर्षण केंद्र ठरणार आहे. या पेन शो मध्ये विविध ब्रॅण्ड्सचे फॉऊंटन पेन, रोलर पेन, बॉल पेन, मेकनाईज्ड पेन्सिल्स पाहायला मिळणार आहेत, तसेच अँटिक पेन पण उपलब्ध असून आपल्याकडील अशी पेन्स विकू ही शकता. या शोमध्ये पाटणा (बिहार) येथील पेन संग्राहक तसेच पेन विश्वातील जाणकार युसूफ मन्सूर आणि प्रा. यशवंत पिटकर यांचे दोन्ही दिवशी मार्गदर्शन लाभणार आहे.द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्टस महाराष्ट्र चॅप्टर कोल्हापूरस सेंटरतर्फे उद्या, शनिवारी २५ मे रोजी दुपारी ४ वाजता द ब्युटिफल वर्ल्ड ऑफ फाउंटन पेन्स यावर मुंबईचे वास्तुविशारद प्रा. यशवंत पिटकर मार्गदर्शन करतील. बुलढाणा येथील हस्ताक्षर कलाकार गोपाल वाकोडे मराठीतून स्वाक्षरीचे प्रात्यक्षिक दाखवतील, गौरव कपूर यांच्या वैशिष्ट्यपूर्ण कलाकुसरीची निब्स या पेन शो मध्ये पाहायला मिळतील.
अबब.. २०० ते ५.५० लाखांपर्यंत पेन! कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय शो
By संदीप आडनाईक | Published: May 24, 2024 5:09 PM