सचिन भोसले ।जिल्ह्यातील दिव्यांगाच्या क्रीडा प्रकाराची सुरुवात करून त्यात स्वत:सह इतरांनाही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर उज्ज्वल कामगिरी करण्यास प्रशिक्षित केले. एवढ नव्हेतर खडतर सराव करत स्वत: आणि इतर दिव्यांग खेळाडूंना राज्याच्या क्रीडाक्षेत्रातील मानाचा शिवछत्रपती पुरस्कारापर्र्यंत पोहोचण्यास बळ दिले. अनेक दिव्यांग खेळाडूंना सरकारी नोकरीची दारेही खुली करून दिली. दिव्यांग खेळाडू ते प्रशिक्षक म्हणून लाभलेल्या शिवछत्रपती पुरस्कारापर्यंतचा त्यांचा प्रवास तर थक्क करणारा आहे. मैदानात आजही नवे खेळाडू घडविण्याची ऊर्मी बघितली तर धडधाकटांनाही लाजवणारी आहे.अशी कामगिरी करणारे दोनवेळचे शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त अनिल पोवार यांची घेतलेली ही चर्चेतील मुलाखत...
प्रश्न : दिव्यांगांच्या क्रीडा प्रकाराकडे कसे वळलात?उत्तर : सन १९९४ मध्ये दिव्यांगांच्या जिल्हास्तरीय तीनचाकी सायकल स्पर्धेत केवळ सहभाग घेतला. तीनचाकी स्पर्धेपासून सुरू झालेला प्रवास थेट शिवछत्रपती पुरस्कारापर्यंत घेऊन गेला. त्यांच्या कामगिरीमुळे कोल्हापूरच्या दिव्यांग खेळाडूंमध्ये भरारी घेण्याची नवी उमेद निर्माण झाली. त्यानंतर सन १९९६ मध्ये त्यांना दिव्यांगांच्याही राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धा होतात, याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पॉवरलिफ्टिंग, थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक, पिस्टल शूटिंग, व्हीलचेअर क्रिकेट, धनुर्विद्या अशा क्रीडाप्रकाराचे तंत्रशुद्ध प्रशिक्षणास सुरुवात केली. त्यात पारंगत होता-होता, इतर दिव्यांग मित्रांना खेळाचे महत्त्व आणि त्याची माहितीही देण्यास सुरुवात केली. इतरांबरोबर स्वत: सराव करण्यास सुरुवात केली. सर्व दिव्यांगांची मोट बांधणे गरजेची बाब आहे, याची जाणीव झाल्यानंतर त्यांनी सन २००६ मध्ये कोल्हापूर जिल्हा पॅरालिम्पिक असोसिएशनची स्थापना केली.
प्रश्न : तुमच्या मार्गदर्शनाचा कितीजणांना फायदा झाला?उत्तर : स्वत: दिव्यांगांच्या स्पर्धेत चमकत असताना कोल्हापूरच्या भूमीतील अन्य दिव्यांगांना ही त्यांच्या क्रीडाकौशल्याला वाव मिळावा यासाठी त्यांनी प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यातून एक नवी पिढी या खेळ प्रकारात पुढे आली. त्यांनी मोठा लौकिकही मिळवून दिला. त्यात मालिनी डवर, शुक्ला बिडकर या खेळाडूंना माझ्याप्रमाणे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त झाला. स्वरूप कुडाळकर, स्वप्निल पाटील,अभिषेक जाधव, आफ्रिदी, भाग्यश्री मांजरे, सदाशिव वालेकर, दिलीप कांबळे अशा अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रकारात उज्ज्वल यश मिळविले आहे.
प्रश्न : शासनाने तुमच्या कार्याची दखल कशी घेतली ?उत्तर : राज्य शासनाच्या क्रीडा खात्याने त्यांना सन २०१४ मध्ये क्रीडाक्षेत्रातील मानाच्या शिवछत्रपती (एकलव्य राज्य क्रीडा पुरस्कार)ने सन्मानित केले. त्यात माझ्या दिव्यांग मैदानी स्पर्धा, सिटींग व्हॉलिबॉल, धनुर्विद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेची दखल घेतली. त्याचार्षी मी मार्गदर्शन केलेल्या मालिनी डवर (दिव्यांग मैदानी स्पर्धा) यांनाही प्रथम शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले. या यशानंतर सन २०१६-१७ या वर्षी त्यांनी मार्गदर्शन केलेल्या शुक्ला बिडकर (दिव्यांग वेटलिफ्टर) हिलाही शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित केले.