कोल्हापूर : कोल्हापूरमधील ‘बंद’ला बुधवारी (दि. ३) हिंसक वळण लागले. त्यामुळे समाजामध्ये तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण व चित्रफिती सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित झाल्यास त्यातून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून गुरुवारी कोल्हापूर जिल्ह्यात मोबाईल(भ्रमणध्वनी)वरील इंटरनेट बंद करण्यात आले होते . त्यामुळे सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित होणाऱ्या विविध स्वरूपातील अफवांना आळा बसला. रात्री बारा वाजेनंतर इंटरनेट सेवा पूर्ववत सुरळीतपणे सुरू झाले.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून बुधवारी रात्री आठ ते गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत मोबाईल इंटरनेट सेवा प्रक्षेपण व वहन, आदींवर जिल्हा प्रशासनाने निर्बंध घातले होते. याबाबतचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांनी बुधवारी काढला होता.
मात्र, कोल्हापूरमधील स्थिती बऱ्यांपैकी पूर्वपदावर आल्याने गुरुवारी सकाळी ब्रॉडबँण्ड आणि मोबाईलवरील इंटरनेट सेवा सुरू राहिली; पण, भारत संचार निगम लिमिटेडच्या (बीएसएनएल) पुणे विभागाकडून कोल्हापूरमधील कार्यालयाला मोबाईलवरील इंटरनेट बंद करण्यात येत असल्याबाबतचा ई-मेल दुपारी २ वाजून ४८ मिनिटांनी प्राप्त झाला.
येथील कार्यालयाने याबाबतची खात्री दिल्यानंतर दुपारी ३ वाजून १४ मिनिटांनी मोबाईलवरील इंटरनेट बंद झाले. टूजी आणि थ्रीजी इंटरनेट सेवा बंद राहिली. त्यामुळे मोबाईलवरील हाताळण्यात येणारी व्हॉटस् अॅप, हाईक आदी सामाजिक माध्यमांचा वापर बंद राहिला. ब्रॉडबॅण्ड सेवा सुरू असल्याने विविध शासकीय आणि खासगी कार्यालयांतील इंटरनेटशी निगडित असणारे कामकाज सुरळीतपणे सुरू होते.
कोल्हापूरमधील ‘बंद’ला हिंसक वळण लागल्याने समाजात तणाव निर्माण करणारे चुकीचे संभाषण व चित्रफीती सामाजिक माध्यमांद्वारे प्रसारित करून अस्थिरता निर्माण केल्या जाऊ शकतात. ते टाळण्यासह सामाजिक शांतता कायम राहावी यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या अहवालानुसार जिल्ह्यातील मोबाईलवरील इंटरनेट बंद करण्याचा आदेश पारित केला. त्यानुसार गुरुवारी मोबाईलवरील इंटरनेट सेवा बंद राहिली.- नंदकुमार काटकर,प्रभारी जिल्हाधिकारी
पुणे विभागाच्या सूचनेनुसार दुपारी तीननंतर कोल्हापूर जिल्ह्यातील मोबाईलवरील इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली. त्यात टूजी आणि थ्रीजी सेवेचा समावेश होता. त्यातील केवळ डाटा बंद करण्यात आला होता. मात्र, ब्रॉडबॅण्ड सेवा सुरू राहिली. गुरुवारी रात्री बारा वाजेपर्यंत मोबाईलवरील इंटरनेट बंद करण्याची सूचना पुणे विभागाकडून आमच्या कोल्हापूर कार्यालयाला करण्यात आली आहे.- व्ही. जी. दरवाजकर,सहाय्यक सरव्यवस्थापक,बीएसएनएल कोल्हापूर.