कोल्हापूर : चाटे शिक्षण समुह पुरस्कृत व कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनवतीने विक्रमवीर भाऊसाहेब निंबाळकर यांच्या स्मरणार्थ आयोजित केलेल्या आंतर जिल्हा निमंत्रत महिला क्रिकेट स्पर्धेत सोलापूर जिल्हा संघाने अंतिम सामन्यांत सांगली संघाचा पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केला.
शाहुपूरी जिमखाना मैदान येथे बुधवारी झालेल्या अंतिम सामन्यांत प्रथम फलंदाजी करताना सोलापूर जिल्हा संघाच्या गोलंदाजापुढे सांगली जिल्हा संघाला शंभर धावाही करता आल्या नाहीत. सांगली जिल्हा संघाने ३७.३ षटकांत सर्वबाद ९५ धावा केल्या. यात आरती विरोजे २१, सोनाली शिंदे १२, ज्योती शिंदे ११ धावा केल्या. गोलंदाजी करताना सोलापूर कडून श्रद्धा तळभंडारी हिने चार, प्रसिद्धी जोशी हिने दोन, वैभवी जगताप, शुभांगी शिवाळ, ऋतु भोसले यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
उत्तरादाखल खेळताना सोलापूर जिल्हा संघालाही विजयीसाठी सांगली संघाने ३५ व्या षटकांपर्यंत झुंजविले. सोलापूर संघाने ३५ षटकांत ७ बाद ९६ धावा करीत विजयासह अजिंक्यपदही पटकाविले. यात मानसी जाधव हिने नाबाद ३८, तर अंजली चित्ते हिने नाबाद १९ धावा करीत संघाला विजयासमीप नेले. सांगलीकडून शिवानी भुकटे, सोनाली शिंदे यांनी प्रत्येकी दोन, तर भक्ती मिरजकर, सोनल पाटील यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. हा सामना सोलापूर संघाने दोन गडी राखून जिंकला.
स्पर्धेचा बक्षिस समारंभ चाटे शिक्षण समुहाचे संचालक डॉ. भारत खराटे यांच्या हस्ते विजेत्या सोलापूर संघास, तर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटणकर यांच्या हस्ते उपविजेत्या सांगली संघास चषक प्रदान करण्यात आला. यावेळी केडीसीएचे उपाध्यक्ष चेतन चौगुले, सचिव केदार गयावळ, सहसचिव जनार्दन यादव, बापूसाहेब मिठारी, अभिजीत भोसले,मधुकर बामणे, अजित मुळीक, अंकुश निपाणीकर, मल्लीनाथ याळगी (सोलापूर) आदी मान्यवर उपस्थित होते.उत्कृष्ट खेळाडू असे,उत्कृष्ट फलंदाज - किरण कांबळे (कोल्हापूर), गोलंदाज- वैभवी जगताप (सोलापूर), यष्टीरक्षक - वैष्णवी शिंदे (सांगली), क्षेत्ररक्षक - सौम्यलता बिराजदार (कोल्हापूर), सामनावीर- मानसी जाधव (सोलापूर), मालिकावीर -सोनाली शिंदे (सांगली) .