कोल्हापूर/निपाणी : गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासासाठी पोलीस पथकांनी शुक्रवारी निपाणीत चौकशी सत्र राबवले. कोल्हापूर पोलीस दल, राज्य दहशतवादीविरोधी पथक (एटीएस) व गुप्तचर यंत्रणा (आयबी) अशी तीन पथके तिथे गेल्याचे समजते. शुक्रवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली या पोलीस पथकाने निपाणीमध्ये असलेल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार व सुपारी घेऊन हत्या करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती घेतली. बारा दिवसानंतरही पोलिसांना पानसरे यांच्या हत्येचे धागेदोरे सापडलेले नाहीत. गडहिंग्लज येथील पोलिसांच्या पथकाने शुक्रवारी दिवसभर निपाणी येथे चौकशीसत्र अवलंबले. यावेळी घटनेच्या परिसरातील मोबाईल टॉवरवरून निपाणी येथील २० कॉलधारकांची चौकशी करण्यात आली; पण तपासात कोणतेच धागेदोरे मिळाले नसून, सखोल चौकशी अद्याप होणार असल्याची माहिती गडहिंग्लजचे पोलीस उपअधीक्षक एम. एम. मकानदार यांनी दिली.तीन दिवसांपूर्वी कोगनोळी येथील दूधगंगा नदीपात्रात बेवारस दुचाकी आढळून आली होती. त्या संदर्भात या पथकाने चौकशी केली. अधिक चौकशीनंतर धागेदोरे कर्नाटक सीमाभागात मिळतील, अशी अपेक्षा या पोलीस पथकाने व्यक्त केली.
गोविंद पानसरे हत्येप्रकरणी निपाणीत चौकशीसत्र
By admin | Published: February 28, 2015 12:19 AM