कोल्हापूर : जबरी चोरीच्या उद्देशाने टाकाळा परिसरात संशयितरित्या फिरणाऱ्या चौघा परप्रांतीयांना बुधवारी दुपारी राजारामपुरी पोलिसांनी पाठलाग करून पकडले. हे चौघे संशयित मध्यप्रदेशातील रेकाॅर्डवरील गुन्हेगार आहेत. मुकेश अमरसिंग मसान्या (वय २५, रा. जोबट, ता. उदयगड, जि. अली-राजपुर, मध्यप्रदेश), राहूल हानसिंग बामन्या (वय २६, गडबोरी, मध्यप्रदेश), राकेश कालू बघेल (वय २८, रा. काटी,मध्यप्रदेश), पानसिंग कालू बघेल (वय २७, काटी, धार, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, या उद्देशाने गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी राजारामपुरी पोलिसांकडून रोज हद्दीमध्ये गस्त घातली जाते. त्यानुसार बुधवारी दुपारी सहायक पोलीस निरीक्षक भगवान शिंदे, सहायक फौजदार राजू कलगुटकर, प्रविण पाटील, सचिन देसाई, अमर आडूळकर, संजय जाधव, नितीन मेश्राम, रवि आंबेकर, विशाल खराडे, अविनाश तारळेकर आदी कर्मचारी गस्त घालत होते.
दरम्यान टाकाळा रोडवरील एका आईस्क्रीम पार्लरजवळ काही तरूण संशयित हालचाली करीत असल्याचे दिसून आले. त्यांना हटकले असता ते पळून गेले. त्यांना राजाराम रायफल्स पासून रूईकर काॅलनीपर्यंत प्रविण पाटील, रवी आंबेकर यांनी पाठलाग करून पकडले. संशयितांच्या पिशवीची झडती घेतली असता त्यात बॅटरी, लोखंडी कटावण्या, पाने, मार्तुल असे साहित्य मिळून आले. ते जप्त करून या चौघा संशयितांना ताब्यात घेत अधिक चौकशी केली असता ते चौघेही रेकाॅर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजले. या चौघांच्या आंतरराज्य टोळीकडून आणखी चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक बी.बी.शिंदे करीत आहेत.