कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील दहाही मतदारसंघांतील शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आज, सोमवारी मुंंबईत ‘मातोश्री’वर झाल्या. पक्षाने प्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी केल्याचे यावरून दिसत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेऊन त्यांची मते जाणून घेतली. यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊन उपस्थित होते. कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज झाल्या. कोल्हापूर जिल्ह्यातील दहापैकी आठ मतदार संघ शिवसेनेकडे असताना त्यांनी आज सर्वच विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्याने राजकीय वर्तुळातील खळबळ उडाली आहे. इच्छुकांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये कोल्हापूर उत्तरमधून विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर, जिल्हाप्रमुख संजय पवार, माजी महापौर सई खराडे, नगरसेवक संभाजी जाधव, कमलाकर जगदाळे, युवा जिल्हाप्रमुख हर्षल सुर्वे. कोल्हापूर दक्षिणमधून जिल्हाप्रमुख विजय देवणे, राजू माने, नगरसेवक संभाजी जाधव, उपजिल्हाप्रमुख सुजित चव्हाण (आजारी असल्याने पत्राद्वारे). करवीरमधून आमदार चंद्रदीप नरके, उपजिल्हाप्रमुख व जि.प. सदस्य बाजीराव पाटील. राधानगरीमधून माजी आमदार बजरंग देसाई, ‘गोकुळ’चे संचालक अरुणकुमार डोंगळे, प्रकाश आबिटकर, उपजिल्हाप्रमुख प्रवीणसिंह सावंत, तालुकाप्रमुख तानाजी चौगुले, भिकाजी हळदकर, प्रकाश पाटील. कागलमधून माजी आमदार संजय घाटगे, महिला जिल्हाध्यक्षा सुषमा चव्हाण, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे. चंदगडमधून जिल्हाप्रमुख विजय देवणे, माजी आमदार नरसिंग पाटील यांचे चिरंजीव राजेश पाटील, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील. शाहुवाडीमधून माजी आमदार सत्यजीत पाटील-सरुडकर, उपजिल्हाप्रमुख जयवंत काटकर. शिरोळमधून जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, शिरोळ तालुकाप्रमुख सतीश मलमे. हातकणंगलेमधून आमदार सुजित मिणचेकर, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी कांबळे. इचलकरंजीमधून जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, नगरसेवक महादेव गौड, उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, शहरप्रमुख धनाजी मोरे, महेश बोहरा यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
दहा मतदारसंघातील शिवसेना इच्छुकांच्या मुंबईत मुलाखती
By admin | Published: September 17, 2014 12:49 AM