लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत आपल्या जिल्ह्यात कोणत्या नवीन संकल्पना आपण राबविल्या याची माहिती पंतप्रधानांच्या समोर मांडा, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज, गुरुवारी १७ जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून या सर्व जिल्ह्यांचा आढावा मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतला. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी कोल्हापूरमधील स्थितीची माहिती दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे उपस्थित होते.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी कडक लॉकडाऊन असतानादेखील रुग्ण व मृत्यू कमी का होत नाहीत, अशी विचारणा करत नियमांची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना केल्या.
जिल्हाधिकारी देसाई यांनी जिल्ह्यात सध्या रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाण जास्त दिसत असले तरी सध्या येथे कोरोनाचा उच्चांक आहे. काही दिवसांनी ही संख्या कमी होईल असे सांगितले. यासह जिल्हा आता ऑक्सिजनच्या पातळीवर स्वयंपूर्ण होत असून जिल्ह्यात उभारण्यात येत असलेल्या ऑक्सिजन प्लांटची माहिती दिली.