कोल्हापूर : अभिजात भारतीय कलाविष्कारानेकलाब्धि आर्ट फेस्टिव्हलला शनिवारपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने पोलीस उद्यानाच्या हिरवळीवर कलेला बहर आला. देशभरातील कलावंतांच्या मांदियाळीने रसिकांनाही कलेचा निस्सीम आनंद दिला. लघुचित्र शैली, वारली पेंटिंग, निसर्गचित्र, अॅक्रॅलिक, शिल्पकला, टेराकोटा, कागदकाम, क्लॉथ पेंटिंग, हस्तकला, मांडणी शिल्प, मंदिर स्थापत्य शैली या कलांचे वैश्विक रूप यानिमित्ताने उलगडले.
महोत्सवाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी सुरेंद्र जैन, अमृता जनवाडकर, डॉ. प्रियदर्शनी जैन, मानवी कामत, आर्किटेक्ट रीमा करंजगार, ग्रीष्मा गांधी, देविणा घाटगे, प्राचार्य अजेय दळवी, चित्रकार विजय टिपुगडे उपस्थित होते. भारतीयत्व ही मध्यवर्ती संकल्पना ठेऊन महोत्सवाची रचना करण्यात आली आहे.
यावेळी डॉ. देशमुख म्हणाले, सहा महिला आपलं कुटुंब, करिअर सांभाळून कलेच्या उत्कर्षासाठी अशा प्रकारचा देशपातळीवरील महोत्सव आयोजित करतात, ही कौतुकाची बाब आहे. पोलीस उद्यानासारख्या ठिकाणी कलेचा महोत्सव भरल्याने या परिसरालाही देखणे रूप आले आहे. कलात्मकतेने भारलेल्या वातावरणात मन सुखावून जाते. देशभरातील कलाकारांना एकाच व्यासपीठावर आणणाऱ्या अशा महोत्सवाचे आयोजन केले जाते. यापुढेही या परिसरात कलांचा मुक्त आविष्कार घडावा.
यानंतर उद्यानाच्या हिरवळीत आणि झाडांच्या आच्छादनात भारतीय कला-परंपरा आकाराला येऊ लागला. देशातील विविध भागातून आलेले कलावंत आपली कला या कलानगरीच्या रंगमंचावर सादर करीत होते. मिनी आर्ट रसिकांना अचंबित करायला लावणारे होते. तर शिल्पकलेतून कलावंत भारतीयत्व ही संकल्पना घेऊन कलाकृती घडवत होते. अहिंसेचा संदेश देणा-या महात्मा गांधींच्या काठीपासून ते भारताचे वैविध्य रूपांचे दर्शन घडवणारे, लेकुरवाळी विठूमाउली, प्राणी, व्यक्तिशिल्प नजर खिळवून ठेवणारे होते. दुसरीकडे कागदकामची कार्यशाळा सुरू होती. एकीकडे शालेय विद्यार्थी मांडणी शिल्प करण्यात गुंतले होते.
अमृता जनवाडकर यांनी कलाब्धिच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. ग्रीष्मा गांधी यांनी महोत्सवाची मांडणी, नेपथ्याची रचना पर्यावरण संवर्धनाचा उद्देश ठेवून केली असल्याचे सांगितले. मानवी कामत यांनी मनोगत व्यक्त केले. यानंतर शिल्प स्पर्धा, शालेय मुलांचे मांडणी शिल्प, छायाचित्रण स्पर्धा अशा स्पर्धा झाल्या.
तीळ आर्ट ते फाईन आर्टमहोत्सवात अगदी तिळावरील कलाकृतींचाही समावेश आहे. भारताची पारंपरिक लघुचित्रशैली, तांदूळ आर्ट, माती काम, पेन्सिल, मेहंदी, हॅन्डलुम, ज्वेलरी, कागदकाम, रद्दीचे नेपथ्य, शोभेच्या वस्तू, निसर्गचित्र, ग्रामीण संस्कृती दर्शवणारे शिल्प, क्लॉथ पेंटिंग अशा विविध प्रकारच्या कला एकाच परिसरात घडत असल्याने प्रत्येक कलाकृती नावीन्याची अनुभूती देणारी आहे. यासह आर्किटेक्टनी बनवलेल्या डिझाईन्सही येथे मांडण्यात आले आहेत.
इको फ्रेंडली नेपथ्यपर्यावरणाला केंद्रस्थानी ठेवून महोत्सवाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते रंगमंचामागील पडदा, उद्यानाची सजावट हे सगळे नेपथ्य इको फ्रें डली वस्तूंपासून करण्यात आले होते.नारळाच्या शेंड्या, कवट्या, गोणपाट, पत्रावळी, कागदी प्लेट, जुने पेपर, कागदी रिबीन या साहित्यांनी महोत्सवाचा सुरेख सेटअप उभारला आहे. महोत्सवात कुठेही फ्लेक्स, प्लास्टिकच्या वस्तूंचा वापर केलेला नाही.
महोत्सवात आजसकाळी साडेआठ ते दोन : प्रत्यक्ष चित्र स्पर्धासकाळी साडेदहा : किचन कंपोस्ट कार्यशाळादुपारी दोन वाजता : नैसर्गिक रंग तयार करणे कार्यशाळासायंकाळी पाच : विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण समारंभ व समारोप