कुडाळ : राज्याबाहेरील विद्यापीठाच्या बोगस पदवी धारण करून आपल्या जिल्ह्यातील विद्यालयांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकांची चौकशी करून त्यांना कार्यमुक्त करावे. योग्य पदविका धारण करूनही नोकरीपासून वंचित असणाऱ्या शिक्षकांवरील अन्याय दूर करा, अशी मागणी श्रीमती मनोरमा महादेव चौधरी चॅरीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनातून केली. या निवेदनात चौधरी यांनी म्हटले की, शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे राज्याबाहेर ज्या विद्यापीठांच्या नावाचा समावेश समावेश शासन निर्णय दिनांक ८ मार्च १९९५, दिनांक १० डिसेंबर १९९८ मधील समयकक्षता यादीत असेल त्याच विद्यपीठाचे पदवीधारक आपल्या राज्यात शिक्षक म्हणून नोकरी करण्यास पात्र ठरतील. असे असतानाही एस. के. पाटील शिक्षक प्रसारक मंडळ पाटमध्ये सन २००८ मध्ये शिक्षक म्हणून नेमणूक झालेल्या एका शिक्षकाच्या पदविकेची चौकशी ग्रामस्थांच्या तक्रारीवरून शिक्षण विभागाने केली. तेव्हा त्या शिक्षकाने घेतलेली पदविका बोगस असल्याचे निदर्शनास आल्याने त्या शिक्षकाला नोकरीवरून कमी करण्यात आले. त्या शिक्षकाकडे उत्तर प्रदेश येथील पदविका होती. (प्रतिनिधी)
बोगस शिक्षकांची चौकशी करा
By admin | Published: September 11, 2015 10:00 PM