मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील चार धनगरवाड्यांवर जाणारे रस्ते अतिवृष्टी व दरडी कोसळल्यामुळे बंद आहेत. या रस्त्याकडे शाहूवाडी पंचायत समितीच्या बांधकाम विभागाचे शाखा अभियंता फिरकलेले नाहीत. रस्ते चालू असल्याचा खोटा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवणाऱ्या शाखा अभियंत्याची चौकशी करण्याची मागणी पंचायत समितीच्या बैठकीत करण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थांनी सभापती विजय खोत होते.
स्वागत गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांनी केले. शाहूवाडी तालुक्यात एक महिन्यापूर्वी अतिवृष्टी झाल्यामुळे रस्त्यावर दरडी कोसळून रस्ते बंद झाले आहे. चांदोली, कांडवण, वाकोली, मालगाव, पुसाळे आदी धनगर वाड्याकडे जाण्याचा रस्ता बंद आहे. मग रस्ते चालू असल्याचा खोटा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे कोणी पाठवला? असा प्रश्न सभापती विजय खोत यांनी मांडला. रस्त्याअभावी नागरिक एक महिना झाले पायपीठ करीत आहेत. संबधित शाखा अभियंता कुडवे तिकडे फिरकलेले नाहीत. मग रस्ता चालू असल्याचा अहवाल दिला कसा. यावर संबंधित अधिकाऱ्यांना उत्तरे देता आली नाहीत. तातडीने रस्ते चालू करा; अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. राष्ट्रीय पोषण महिला अभियानाची शुभारंभ सभापती विजय खोत, उपसभापती दिलीप पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. महाआवास योजनेअंतर्गत ज्या लाभार्थींनी चांगले घरकूल बांधले अशा लाभार्थी, ग्रामसेवक यांचा सत्कार करण्यात आला.
सभेस सर्व पंचायत सदस्य, सदस्या, अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.