लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : लॉकडाऊन असतानाही रुग्ण का वाढत आहेत, यामागील कारणे तपासा, टेस्ट वाढवा, बाधितांचे गृहविलगीकरण बंद करा, अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला केल्या.
मंत्री थोरात यांनी कोल्हापूरसह १५ जिल्ह्यांचा कोरोना आढावा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेतला. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, पोलीस महासंचालक संजय पांडे व कोल्हापुरातून जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे उपस्थित होते.
ते म्हणाले, लॉकडाऊन असतानाही रुग्णसंख्येचा आकडा कमी होत नाही, याची कारणे तपासा. त्यानुसार दुरुस्ती करा. ग्रामीण भागात टेस्ट वाढवा. बाधितांना होम आयसोलेशन न करता इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करा. त्याचठिकाणी त्यांना आवश्यक सुविधा देता येतील, त्या ठिकाणी उपचार करता येतील यासाठी प्रयत्न करा.
टेस्ट वाढवल्या तर बाधितांची संख्या वाढू शकते, याची काळजी करू नका. उलट त्यांच्यावर लवकर उपचार केले, तर ते बरे होऊन लवकर घरी परततील. त्याचा परिणाम ऑक्सिजन, रेमडेसिविर इथंपर्यंत होणार नाही, असेही त्यांनी सांगितले.