शिरोळ : खोट्या गुन्ह्याची भीती घालून खंडणी मागितल्यामुळेच राजाराम माने यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आले. त्यामुळे माझ्या कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त करणाºया संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना पाठीशी न घालता या गुन्ह्याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडे द्यावा, अशी मागणी मृत राजाराम माने यांची पत्नी वासंती माने यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन राष्ट्रीय मानवाधिकार यांच्यासह राज्यपाल, मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री, पोलीस महासंचालकांना पाठविले आहे.निवेदनात असे म्हटले आहे की, गुन्हेगार प्रवृत्तीच्या पोलिसांनी माझे पती राजाराम यांना खोट्या गुन्ह्यात व अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात अडकविण्याची भीती घालून नाहक त्रास दिला. वेळोवेळी खंडणी स्वरुपात रक्कम घेतली. आणखीन रकमेसाठी पोलिसांनी त्रास देवून तगादा लावल्यामुळेच हा प्रसंग घडला. पोलिसांच्या या कृत्यामुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावयाचा याबाबत शासनाने गांभीर्याने विचार करावा. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांची चौकशी झाली पाहिजे. त्याचबरोबर शिंदे नामक पोलिसावर अद्याप कारवाई झालेली नाही. राजाराम यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाºया पोलिस निरीक्षक उदय डुबल, भुजंग कांबळे, निखिल खाडे, शशिकांत साळुंखेसह शिंदेनामक पोलिसावर कारवाई करावी, यासाठी या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे देण्याची मागणी निवेदनात केली आहे.आत्महत्येप्रकरणी २४ जणांची चौकशीसंशयित आरोपी निखिल खाडे याच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्सवरून सोमवारपर्यंत २४ जणांची चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून सखोल तपास सुरूआहे. शिंदे नावाच्या पोलिसाबाबतही चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित पोलीस कॉन्स्टेबल भुजंग कांबळे, स्वाती माने, निखिल खाडे, शशिकांत साळुंखे व शिंदेनामक पोलीस अशा पाचजणांवर गुन्हा दाखल झाला असून, चौघांना १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. खाडे याच्या मोबाईलवरील कॉल डिटेल्सची तपासणी करण्यात आली असून, आतापर्यंत २४ जणांचे जबाब नोंदविण्यात आलेले आहेत. खाडे याच्या मोबाईलवरून ज्यांना ज्यांना कॉल गेले आहेत, त्या सर्वांची चौकशी सुरू असल्याची माहिती सपोनि समीर गायकवाड यांनी दिली.