कोल्हापूर : साखर कारखाने आर्थिक अडचणीत आल्याने राज्य बँकेने रितसर टेंडर काढून कारखान्यांची विक्री केली. असे असताना भाजपचे नेते ईडीची कारवाई करत आहेत. मात्र, ज्यांच्यामुळे हे साखर कारखाने अडचणीत आले त्या संचालकांची चौकशी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लावावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली.साखरेचे दर व द्यावी लागणारी ऊसाची एफआरपी याचा ताळमेळ बसत नसल्याने साखर कारखाने कोट्यवधींच्या तोट्यात गेले. परिणाम राज्य बँकेचे कर्ज थकीत गेले आणि बँकही अडचणीत येऊ लागली. बँकेचा एनपीए वाढल्याने नाईलाजाने बँकांना साखर कारखाने विकण्याशिवाय पर्याय नसतो.महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जे कारखाने विकले आहेत त्यांची किंमत करून प्रसिद्धी माध्यमातून निविदा काढून ज्यांची जास्त बोली आलेली आहे, त्यांनाच हे कारखाने विकले गेले आहेत. असे असताना केवळ राजकारण म्हणून यामध्ये घोटाळे आहेत. ईडीची चौकशी केली गेली. आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून विक्री झालेल्या म्हणजेच सर्व ५४ कारखान्यांची चौकशी लावणार असल्याचे चंद्रकांत पाटील सांगत आहेत. मी त्यांना विनंती करेन की त्यांनी तत्काळ विनाविलंब चौकशी लावावी.
या सगळ्या व्यवहाराचे दूध का दूध, पानी का पानी यापूर्वीच झालेले आहे. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी झालेली आहे, माजी न्यायाधीशांनीदेखील चौकशी केलेली आहे. त्यातून काहीही निष्पन्न झालेले नाही. ज्या कारखान्यांच्या संचालकांनी कारखाने तोट्यात घातले त्यांची वास्तविक चौकशी होणे गरजेचे असल्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकात म्हटले आहे.