लोकमत न्यूज नेटवर्क
बोरवडे : येथील गाव तलावातील मासेमारी लिलावात सत्तारुढ गटाने भ्रष्टाचार केला आहे. मागील सहा वर्षांतील लिलावातून मिळालेल्या रकमेची ग्रामपंचायतीच्या दफ्तरी नोंद नसून, ही रक्कम परस्पर अन्य ठिकाणी वापरली आहे. या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी आणि संबंधितांकडून ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संभाजी फराकटे यांनी केली आहे. २०१५पासून गाव तलावातील मासेमारीचा ठेका दिलेल्या ठेकेदाराकडून सत्तारुढ गटाने परस्पर रक्कम घेतली आहे. गेली चार वर्षे या लिलावातून मिळालेल्या लाखो रुपयांच्या रकमेची ग्रामपंचायतीच्या दफ्तरी नोंदच नाही.
तसेच या रकमेची पावतीही संबंधित ठेकेदाराला ग्रामपंचायतीने दिलेली नाही. या प्रकरणातील गैरव्यवहाराची चौकशी व्हावी आणि संबंधितांकडून ही रक्कम वसूल करावी, अशी मागणी फराकटे यांनी केली आहे.
कोट :
ग्रामपंचायतीने मासिक सभेमध्ये ठराव करुन रितसरपणे लिलावाची प्रक्रिया राबवली आहे. ठेकेदाराने लिलावाची रक्कम दिल्यानंतर पुढील चार महिन्यापर्यंत त्याला मासेमारीसाठी परवानगी दिली आहे. याविषयी विरोधकांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून, ते राजकीय स्वार्थापोटी केलेले आहेत.
- गणपतराव फराकटे, सरपंच, बोरवडे