कोल्हापूर : महापालिकेमधील घरफाळा घोटाळ्याची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, अशा मागणीचे निवेदन शहर व जिल्हा नागरी कृती समितीकडून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. यावेळी मंत्री शिंदे यांनी मंत्रालयात बैठक घेऊन चौकशीचे आदेश देऊ, महापालिकेच्या कारवाईचा आढावा घेऊ, असे आश्वासन दिले.
या निवेदनात मालकांशी तोडपाणी करुन एखाद्या इमारतीचा घरफाळा वार्षिक साठ लाख रुपये होत असेल तर त्याठिकाणी फक्त पाच ते सहा लाख रुपयांच्या घरफाळ्याची आकारणी केली आहे. याबाबत सामाजिक संघटना, कार्यकर्ते यांनी लेखी पुरावे दिले आहेत. मात्र, असे असताना महापालिका त्यांच्यावर किरकोळ स्वरुपाची कारवाई करत आहे. हा घोटाळा करणारे मुख्य सूत्रधार मोकाट फिरत असल्याचे म्हटले आहे.
कोट्यवधींचा हा घोटाळा असण्याची शक्यता असून, संबंधितांवर कारवाई झाल्यास अशा गुन्हेगारांना वचक बसेल व राज्यात कोठेही स्थानिक स्वराज्य संस्थेत असे घोटाळे होणार नाहीत. यावेळी अशोक पवार, रमेश मोरे, पप्पू सुर्वे, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत सूर्यवंशी, किशोर घाडगे, यशवंत वाळवेकर, संभाजी जगदाळे उपस्थित होते.
चौकट
महापालिका इमारतीसाठी तातडीने निधी उपलब्ध करू
महापालिकेचा प्रशासकीय कारभार सव्वाशे ते दीडशे वर्षांपूर्वीच्या संस्थानकालीन इमारतीमधून चालतो. वाढते शहर, कामाचा व्याप पाहता ही इमारत अतिशय अपुरी पडत असल्यामुळे या कार्यालयातील बऱ्याचशा विभागांची कार्यालये शहरामध्ये जागा उपलब्ध होईल, त्याठिकाणी आहेत. त्यामुळे नागरिकांना एका कामासाठी शहरभर फिरावे लागते. नागरिकांना वाहनांच्या पार्किंगलाही जागा नाही. नगरविकास खात्याकडून निधी देऊन सुसज्ज अशी इमारत बांधून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली. यावर मंत्री शिंदे यांनी इमारतीसाठी तातडीने निधी उपलब्ध करु, अशी ग्वाही दिली.