कोल्हापूर : रवि को-आॅप. बँकेचे अवसायक प्रदीप मालगावे, व्यवस्थापक राजेंद्र पायमल व वसुली अधिकारी प्रशांत खाडे यांनी संगनमताने छपाई, स्टेशनरीसह इतर खर्चात मोठा ढपला पाडला असून त्यांच्या काळात झालेल्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधकांकडे मंगळवारी केली.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांची भेट घेऊन रवी बँकेच्या कारभाराचा पाढाच वाचला. कर्ज थकीत असताना संबंधित कर्जदारांना ‘ना हरकत दाखला’ दिल्याचे निदर्शनास आणून देत कर्ज परतफेडीचा दाखला दिला तर खात्यावरील कर्जाची जबाबदारी अधिकाऱ्यांवर टाका, अशी मागणी संजय पवार यांनी केली. अवसायनातील बँकांच्या लाखांवरील ठेवी परत करता येत नसताना अधिकाऱ्यांनी आर्थिक व्यवहार करून नियम धाब्यावर बसवत दीड लाखांपर्यंतच्या ठेवी परत केल्या आहेत. मालमत्तांची तपासणी न करता कार्यालयात बसून ‘व्हॅल्युएशन फी’च्या नावाखाली खर्च टाकून संगनमताने पैसे हडप केले आहेत. एकरकमी परतफेड योजनेत मर्जीतील लोकांना व्याजात भरमसाठ सवलत देऊन त्यामध्येही हात मारल्याचा आरोप पवार यांनी केला. बँकेचे अवसायक प्रदीप मालगावे यांनी सन २०१३-१४ पासून व्हॅल्युएशन, छपाई, स्टेशनरी, किरकोळ खर्च या नावाखाली लाखो रुपये खर्च टाकला आहे. हा खर्च बेकायदेशीर असून त्याची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून वसूल करावेत, अशी मागणी पवार यांनी केली. त्यावर संबंधित कालावधीत झालेल्या कारभाराची चौकशी करून दोेषींवर कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हा उपनिबंधक काकडे यांनी दिले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख शिवाजी जाधव, करवीर पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णात पोवार, रवी चौगुले, सुजित चव्हाण, कमलाकर जगदाळे, शशिकांत बिडकर, उमेश यादव, संभाजी शिंदे, राजू कांबळे, रघुवीर कांबळे, उपस्थित होते.कामकाज बंद मग लाखोंची खरेदी कशी?बॅँक सन २००७ ला अवसायनात काढल्यापासून कामकाज बंद आहे; तरीही स्टेशनरी, छपाई, प्रवास, किरकोळ खर्चावर लाखो रुपयांची उधळपट्टी कशी? सात हजारच्या बॉक्स फायली लागतात कशाला? अशी विचारणा करत संजय पवार यांनी बँकेतील भ्रष्टाचाराचा भांडाफोडच केला.
रवि बँक अवसायकांची चौकशी करा
By admin | Published: June 29, 2016 1:01 AM