कोल्हापूर : महानगरपालिकेतील घरफाळा विभागातील घोटाळ्याची चौकशीला दिरंगाई होत असून ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे सखोल चौकशी संबंधित सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरसेवक जयंत पाटील व ॲड. बाबा इंदूलकर यांनी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिले.चौकशीप्रकरणी दिरंगाई होत आहे, कागदपत्रे नाचविण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे प्रत्येक दिवशी आरोप प्रत्यारोप होऊन महापालिका बदनाम होत आहे. जनतेत संभ्रम निर्माण झालेला आहे. या घोटाळ्याची सखोल चौकशी होण्यासाठी चार्टर्ड अकौटंट यांची सेवा महापालिकेने उपलब्ध करून द्यावी. याआधी दाखल झालेल्या गुन्ह्यातील आरोपीने अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. त्यावेळी उच्च न्यायालयात सरकारी वकिलांना महापालिकेकडून योग्य ती व सत्य माहिती दिली गेली नाही ही बाब गंभीर आहे.
याविषयी योग्य त्या कारवाया व दुरुस्त्या होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे. आयुक्त बलकवडे यांच्याशी झालेल्या चर्चेवेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, मुख्य लेखापरीक्षक धनंजय आंधळे उपस्थित होते.