कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी निवडणुकीत सादर केलेल्या प्रमाणपत्रात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचे जाहीर केले आहे. व्हिडीओ गेम पार्लर शिवाय इतर उत्पनाचे स्त्रोत नसताना त्यांनी ही संपत्ती कशाच्या जीवावर कमवली याची सखोल चौकशी करा, अशी मागणी शिवसेना महिला आघाडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. पोलीस उपअधीक्षक सरदार नाळे यांना याबाबतचे निवेदन दिले. पवार आणि टोळी शासकीय कार्यालयात आंदोलने करत अधिकाऱ्यांना धमकावून पैसे वसूलीचा धंदा करत असल्याचा आरोपही करण्यात आला.पवार यांनी जयप्रभा स्टुडिओ प्रकरणात नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या व्यवहाराची चौकशीची मागणी केली होती. यानंतर क्षीरसागर गटाने ही पवार यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली. महिला आघाडी महानगरप्रमुख मंगल साळोखे, पवित्रा रांगणेकर, पूजा भोर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने याबाबत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे, संजय पवार यांनी अनेक वर्षे गैरकृत्यातून कोट्यवधींची संपत्ती गोळा केली आहे. ते पद्मा टॉकीज चौकातील खासगी दुकान गाळ्यामध्ये बसून नागरिक, बांधकाम व्यावसायिक, व्यापारी यांना त्यांना धमकावून हप्ते वसूल करतात. पवार आणि टोळी आंदोलने करत अधिकाऱ्यांना धमकावून पैसे वसूल करते. पवार यांचे व्हिडीओ गेम पार्लर शिवाय कोणतेही इतर आर्थिक स्त्रोत नसताना त्यांनी निवडणुक आयोगास सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात कोट्यावधी रुपयांची मालमत्ता असल्याचे कबूल केले आहे. ही मालमत्ता त्यांनी गोळा केली कशी..? याची सखोल चौकशी करावी अन्यथा, जनआंदोलन उभे करु.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय पवारांच्या मालमत्तेची चौकशी करा, क्षीरसागर गट आक्रमक
By इंदुमती सूर्यवंशी | Published: August 10, 2023 6:19 PM