लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : जलयुक्त योजनेतून जिल्ह्यात झालेल्या कामांची जबाबदार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशी मागणी मंगळवारी शिवसेनेने जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्याकडे केली. गगनबावडा तालुक्यातील साखरी-म्हाळुंगे कामात अधिकारी व ठेकेदाराने मोठा ढपला पाडला असून, तालुक्यातील सर्वच कामे संगनमताने लुटल्याचा आरोप जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी यावेळी केला. ‘जलयुक्त’मधील कामातील भ्रष्टाचाराबाबत मंगळवारी शिवसेनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निदर्शने केली. कृषी, वनविभागाच्या कारभाराच्या पंचनामा करणाऱ्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. त्यानंतर जिल्हाधिकारी सुभेदार यांना निवेदन दिले. अनेक तालुक्यांत निकृष्ट दर्जाची कामे झाली असून, पाणी मुरण्याऐवजी पैसे मुरवण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले आहे. कुंभोज, तमदलगे येथे झालेल्या ‘जलयुक्त’च्या कामाची चौकशी झाली; पण अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी अधिकाऱ्यांनीच हा अहवाल दडपला आहे, असा आरोप पवार यांनी केला. ‘जलयुक्त’च्या झालेल्या कामांची माहिती घेऊन चौकशीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, हर्षल सुर्वे, सुजित चव्हाण, रवी चौगुले, राजू यादव, विराज पाटील, दत्ताजी टिपुगडे, तानाजी आंग्रे, सर्जेराव पाटील, विनोद खोत, भगवान कदम, शुभांगी पोवार, रिया पाटील, सुजाता सोहनी, कमलाकर जगदाळे, डॉ. अनिल पाटील, शशिकांत बिडकर आदी उपस्थित होते. अधिकाऱ्यांनी फसवले!मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची ‘जलयुक्त’बाबतची भूमिका चांगली आहे; पण यापूर्वीच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर वस्तुस्थिती ठेवली नसल्याने या कामांचा बोजवारा उडला आहे. दादांना अधिकाऱ्यांनी फसवल्याचे संजय पवार यांनी सांगितले. ‘साखरी-म्हाळुंगे’ प्रकरणी पैसे दिले कोणाला?साखरी-म्हाळुंगे येथील निकृष्ट कामाचा शिवसेनेने पर्दाफाश केला. त्यावेळी कृषी अधिकारी नामदेव परीट यांनी थेट आॅफर देऊन आंदोलन थांबविण्याची विनंती केली. त्यापुढेही जाऊन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला तीन लाख दिल्याचे म्हटले, पण परीट यांनी हे पैसे दिले कोणाला आणि घेतले कोणी याचे नाव त्यांनी जाहीर करावे, अन्यथा कायदेशीर मार्गाने शोधून काढू, असा इशारा पवार यांनी दिला.
‘जलयुक्त’ कामांची चौकशी करा
By admin | Published: May 31, 2017 1:09 AM