लोकमत न्यूज नेटवर्क
सरवडे : काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे कि.मी. १६ पासून मुदाळतिट्ट्यापर्यंत नवीन अस्तरीकरण करण्यात आले आहे. कोट्यवधी रुपयांच्या या कामात अनेक त्रुटी असून दर्जाहीन काम झाल्याने कामाची चौकशी व्हावी व जबाबदार घटकांवर कारवाई व्हावी, अशी मागणी माजी पंचायत समिती सदस्य आर. के. मोरे यांनी केली आहे. कोल्हापूर येथील पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता यांना निवेदन देऊन ही मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे, काळम्मावाडी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचे अस्तरीकरण करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या वतीने निविदा काढण्यात आली. काम घाईगडबडीत सुरू केल्याने योग्य दर्जाचे नसल्याची ग्रामस्थांनी तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष केले आहे.स्थानिक लोकांनी निकृष्ट कामाची माहिती देऊनही संबंधितांवर कारवाई केली नाही, काही ग्रामपंचायतींनी कालव्यावर आरसीसी पूल बांधण्याची व घाट बांधण्याची ठरावाद्वारे मागणी केली, त्याची पूर्तता न करता उलट जुने रँप काढून लोकांची गैरसोय केली आहे. या कामातील संबंधितांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.