कोल्हापूर : वारणानगर (ता. पन्हाळा) येथील शिक्षक कॉलनीतील चोरी प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) देण्याचे आदेश राज्याचे पोलिस महासंचालक सतीश माथूर यांनी कोल्हापूर पोलिसांना दिले. त्यानुसार सीआयडीचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी पोलिस अधीक्षक एम. बी. तांबडे यांची भेट घेऊन तपासासंबंधी चर्चा करून यासंबंधी तपासाची फाईल ताब्यात घेतली. कोडोली पोलिस ठाण्यातील चोरीच्या दोन्ही गुन्ह्णांचा तपास आज, गुरुवारपासून ‘सीआयडी’चे पथक करणार आहे. तपास वर्ग झाल्याने सांगली-कोल्हापूर पोलिस दलातील काही पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान, तपास अधिकारी सहायक पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह तीन विशेष पथकांनी बुधवारी सकाळी पुणे, सांगली, मिरज, कवलापूर या तिन्ही ठिकाणी संशयित पोलिसांच्या घरांवर छापे टाकले असता सर्वजण कुटुंबासह घराला कुलूप लावून पसार झाल्याचे दिसून आले. या सर्वांच्या घरांवर निलंबनाची नोटीस चिकटवून पथके माघारी परतली. संशयितांनी मोबाईल बंद ठेवल्याने त्यांचे लोकेशन मिळून आले नाही. त्यांचे नातेवाईक, मूळ गावचा पत्ता पोलिसांनी उपलब्ध केला आहे. मिरजेतील बेथेलहेमनगरमध्ये राहणाऱ्या मैनुद्दीन मुल्ला याच्या घराचीही पोलिसांनी झडती घेतली. त्यांच्या संपर्कात व जवळच्या सुमारे ४० ते ५० नातेवाईक, मित्रांकडे पोलिसांनी दिवसभर चौकशी केली. या सर्वांना अटक करण्यासाठीच पथके रवाना झाली होती; परंतु कोणीच मिळून आले नाही. त्यांनी चोरीचा पैसा कुठे गुंतविला आहे, त्यासंबंधीची कागदपत्रे मिळविण्यासाठी स्वतंत्र पथक काम करत आहे. शिक्षक कॉलनी चोरी प्रकरणात संगनमताने ९ कोटी १८ लाख रुपये परस्पर हडप करून खोटा तपास दाखविल्याप्रकरणी सांगलीच्या तत्कालीन स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक विश्वनाथ घनवट, सहायक पोलिस निरीक्षक सूरज चंदनशिवे, सहायक फौजदार शरद कुरळपकर, पोलिस हवालदार दीपक पाटील, शंकर पाटील, पोलिस नाईक रवींद्र पाटील, कुलदीप कांबळे यांच्यासह मोहिद्दीन ऊर्फ मैनुद्दीन अबुबकर मुल्ला (रा. जाखले, ता. पन्हाळा), प्रवीण भास्कर-सावंत (रा. वासूद, जि. सांगोला) यांच्या विरोेधात कोडोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गेल्या वर्षभरापासून या चोरीचा तपास सुरू आहे. सांगली पोलिसांनी तपासाच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लाटल्याचे उघडकीस आल्याने राज्यभर हे प्रकरण गाजत आहे. या गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग(सीआयडी)कडे वर्ग करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पोलिस महासंचालक माथूर यांना पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार त्यांनी बुधवारी हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्याचे आदेश कोल्हापूर पोलिसांना दिले. सीआयडीचे कोल्हापूर विभागाचे पोलिस अधीक्षक बनसोडे यांनी तांबडे यांची भेट घेऊन तपासासंबंधी चर्चा केली. कोल्हापूर पोलिसांनी आतापर्यंत केलेल्या तपासाची फाईल बनसोडे यांच्याकडे सुपूर्द केली. आता या गुन्ह्णाच्या तपासाला गती मिळणार आहे. (प्रतिनिधी) संशयिताकडे चौकशी वारणा चोरीप्रकरणी एका संशयितास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले. त्याच्याकडे दिवसभर चौकशी सुरू होती. तो संशयित चोरटा मैनुद्दीनच्या जवळचा साथीदार असल्याची चर्चा होती.
वारणा चोरीचा तपास ‘सीआयडी’कडे
By admin | Published: April 20, 2017 1:32 AM