कुरुंदवाड : सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांच्या खूनप्रकरणी सांगली महापालिकेचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्यासह आणखी एका माजी नगरसेवकाची इचलकरंजी उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी चौकशी केली. त्यामुळे खुनात राजकीय लोकांचाही सहभाग असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.दरम्यान, खुनात सहभागी असलेल्या आणखी दोन संशयितांचा अद्याप शोध लागलेला नाही. संतोष यांचा नांदणी भैरववाडी रस्त्यावर त्यांच्या चारचाकी गाडीतच बुधवारी (दि. ७) खून झाला होता. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. पैशाच्या देवाणघेवाणीतून खून केल्याची कबुली त्यांनी दिली असली, तरी यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे याचा पोलिस तपास करत आहेत.खुनामध्ये आणखी दोन संशयित सहभागी असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले असून, ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या शोधासाठी पोलिस पथक नेमण्यात आले असल्याची माहिती कुरुंदवाड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांनी दिली.तर सांगलीचे माजी नगरसेवक मंगेश मारुती चव्हाण गुंड प्रवृत्तीचे असून, त्यांच्यापासून जीविताला धोका असल्याची तक्रार यापूर्वी पोलिसांत केली होती. त्यामुळे खुनात चव्हाण यांचा समावेश असल्याची शक्यता व्यक्त करून वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी, अशी लेखी मागणी मयत संतोष यांच्या पत्नी प्रज्ञा कदम व प्रफुल्ल कदम यांनी सांगली जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली आहे. त्यामुळे माजी नगरसेवक चव्हाण यांच्यासह आणखी एका माजी नगरसेवकाची चौकशी करून सोडून देण्यात आले.
Kolhapur: संतोष कदम खूनप्रकरणी माजी नगरसेवकाची चौकशी, तिघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 1:40 PM