कोल्हापूर : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या कर्मभूमी असलेल्या कोल्हापुरात या महिन्याच्या अखेरीस विविध आजारावर दिव्य मंत्रांनी तसेच दैविक प्रार्थना करण्याकरिता कोल्हापूर श्री महालक्ष्मी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. संयोजकांना वैद्यकीय उपचाराविषयी जाहिरातीचा फंडा अवलंबला आहे. त्याची गंभीर दखल महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे. त्यामुळे हा महोत्सव अडचणीत आला आहे.श्री कृष्णगिरी पार्श्व पद्मावती सेवा ट्रस्ट, महाराष्ट्र शाखेतर्फ येथील सुवर्णभूमी लॉन, शिरोली जकात नाका येथे २६ फेब्रुवारीपासून ५ मार्चअखेर हा महोत्सव आहे. त्याची मोठी जाहिरातबाजी फ्लेक्स, केएमटी बसवर करण्यात आली आहे. डोकेदुखी, पाेटदुखी, पायदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी अशा दीर्घ आजारावर महोत्सवात दिव्य मंत्रांनी तसेच दैविक प्रार्थनेद्वारे उपचार केले जाणार आहेत. भूतलावावरील सर्वांत मोठी २१ फुटी महालक्ष्मी मूर्ती उभारली जाणार आहे. त्याशिवाय अष्टलक्ष्मीच्या आठ तर अष्टभैरवच्या आठ मूर्ती उभारल्या जाणार आहेत. महोत्सवात १०८ कुंडीय महायज्ञही होणार आहे. महोत्सवास कृष्णगिरी शक्तीपिठाधिपती राष्ट्रीय संत वसंत विजय महाराज उपस्थित राहणार आहेत.
संयोजक कोण?
महोत्सवाचे नियोजन पाहून अनेकांचे डोळे विस्फारले आहेत. संयोजक कोण आहेत, त्यांनी परवानगी घेतली का, अशा प्रकारची विचारणा होऊ लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे. संयोजकांना पत्र पाठवून त्यांच्याकडून रितसर सर्व परवानगीची कागदपत्रे सत्वर सादर करण्याबाबत मागणी केली आहे.
सिद्धमूर्ती विक्रीशी अंबाबाई मंदिराशी संबंध नाहीश्री महालक्ष्मी, कोल्हापूर या नावाचा अनाधिकाराने वापर करून पूजा, होमहवन व सिद्धमूर्ती विक्री असा कार्यक्रम बाह्यशक्तींनी जाहीर केला आहे. मात्र, या होमहवनशी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीशी, अंबाबाई मंदिराशी संबंध नाही, असे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी बुधवारी स्पष्ट केले.करवीरनिवासिनी देवस्थान हे अंबाबाई, महालक्ष्मी नावाने ओळखले जाते. एका संस्थेने त्यांच्या धार्मिक उत्सवासाठी देवीचा उल्लेख केल्याने गैरसमज निर्माण होऊन भाविक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या कार्यालयाकडे माहिती मागत आहेत. मात्र, असा कोणताही विधी किंवा प्रार्थना हा या देवस्थानच्या पूजा अर्चेचा भाग नाही. देवस्थान समितीच्या वतीने अशा कोणत्याही प्रकारचा हवन व मूर्ती विक्री असे कार्य केले जात नाही, असे समितीने म्हटले आहे.