कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यात समभाग खरेदी आणि सभासद नोंदणीच्या आमिषाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री तथा आमदार हसन मुश्रीफ यांनी शेतक-यांची सुमारे ४० कोटी रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास नुकताच आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला असून, तक्रारदारांचा ओघ वाढत आहे.आमदार हसन मुश्रीफ यांनी शेतक-यांकडून प्रत्येकी दहा हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याची फिर्याद विवेक विनायक कुलकर्णी (रा. कागल) यांनी २६ फेब्रुवारीला मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी आमदार मुश्रीफ यांच्यावर ४० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी या गुन्ह्याचा तपास नुकताच आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवला. त्यामुळे या गुन्ह्याच्या तपासाची सूत्रे आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने स्वीकारली असून, तक्रारदार शेतक-यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.दरम्यान, फिर्यादी कुलकर्णी यांच्यासह १३ शेतक-यांनी सुरुवातीला पोलिसांकडे तक्रार अर्ज दिले होते. मात्र, गुन्हा दाखल होताच तक्रारींचा ओघ वाढत आहे. आणखी २२ शेतक-यांनी तक्रार दिल्याने एकूण ३५ शेतक-यांचे अर्ज आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे पोहोचले आहेत. याची व्याप्ती आणखी वाढू शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.मुश्रीफ समर्थकांची ईडी कार्यालयावर धडकआमदार मुश्रीफ यांची सातत्याने ईडीकडून होणा-या चौकशीच्या विरोधात गुरुवारी (दि. २३) कागल तालुक्यातील शेकडो शेतक-यांनी मुंबईत ईडीच्या कार्यालयाबाहेर निदर्शने केली. राजकीय द्वेषातून जाणीवपूर्वक आमदार मुश्रीफ आणि घोरपडे साखर कारखान्याची बदनामी केली जात असल्याचा आरोपही शेतक-यांनी केला.