कोल्हापूर : गडहिंग्लज येथील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालवण्यास घेणाऱ्या ‘ब्रीक्स’ कंपनीच्या कर्जप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी संचालक सर्जेराव पाटील-पेरीडकर, अनिल पाटील व विलास गाताडे या तिघांना ‘ईडी’ने समन्स बजावले आहे. त्यांची चौकशी झाली असून मागील संचालक मंडळातील सर्वांचीच या प्रकरणात चौकशी होण्याची शक्यता आहे.‘ब्रीक्स’ कंपनी व संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या एकूणच आर्थिक व्यवहाराबाबत ‘ईडी’कडे तक्रार झालेली आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांनी अगोदर दोन्ही कारखान्यासह आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे टाकून चौकशी केली. त्यानंतर २१ दिवसांनी जिल्हा बँकेच्या मुख्य कार्यालयासह सेनापती कापशी (ता. कागल), हरळी (ता. गडहिंग्लज) येथील शाखा व संताजी घोरपडे साखर कारखान्यांवर छापे टाकून चौकशी केली. तब्बल दोन दिवस त्यांनी घोरपडे कारखाना व ब्रीक्स कंपनी यांचे जिल्हा बँकेशी झालेल्या व्यवहाराची कसून चौकशी केली.आप्पासाहेब नलवडे साखर कारखाना २०१३-१४ मध्ये ‘ब्रीक्स’ कंपनीने भाडेतत्त्वावर चालवण्यास घेतला. त्यानंतर २०१५ पर्यंत त्यांनी राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्जपुरवठा घेतला. २०१५ नंतर त्यांनी जिल्हा बँकेकडून कर्ज घेण्यास सुरुवात केली. या कालावधीत कंपनीने घेतलेल्या कर्जाबाबत ‘ईडी’ला हरकत आहे. ‘ईडी’ने याबाबत जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांच्यासह पाच अधिकाऱ्यांना समन्स बजावून चौकशी केली आहे.
कर्ज वाटप करताना बैठकीत सहभागी असलेले सर्जेराव पाटील, अनिल पाटील व विलास गाताडे या तिघांना समन्स बजावून त्यांची मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशी झाली आहे. मागील संचालक मंडळातील या कर्जप्रकरणाची संबंधितांची चौकशी होण्याची शक्यता आहे.