कोल्हापूर : कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समरजित घाटगे यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी, अन्यथा काहीतरी बरेवाईट घडेल, अशी धमकी त्यांच्या मातोश्री सुहासिनीदेवी घाटगे यांना मोबाईलवर देणाऱ्या अज्ञाताचा शाहूपुरी पोलीस व सायबर क्राइम अशी दोन पथके कसून शोध घेत आहेत. लवकरच या प्रकरणाचा छडा लावू, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.पोलिसांनी सांगितले, सुहासिनीदेवी घाटगे यांच्या दोन मोबाईल नंबरवर धमकीचे फोन शुक्रवारी (दि. ४) आणि शनिवारी (दि. ५) आले होते. या घटनेने वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच जिल्ह्यात खळबळ उडाली. धमकीचा मानसिक ताण आल्याने सुहासिनीदेवी घाटगे यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे.
समरजित घाटगे यांनी सोमवारी (दि. ७) शाहूपुरी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञातावर अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. सुहासिनीदेवी यांचा कीपॅडचा साधा मोबाईल आहे. हे दोन्ही मोबाईल पोलिसांनी तपासले. धमकी ज्या फोनवरून आली, तो नंबर त्यांच्या मोबाईलमधून डिलीट झाला आहे. त्यांनी संबंधित कंपनीकडे इनकमिंग नंबरची माहिती मागितली आहे. या तपासासाठी सायबरतज्ज्ञांची मदत घेतली आहे, असेही डॉ. देशमुख यांनी सांगितले.बंदूकधारी शरीररक्षकाची नियुक्तीसमरजित घाटगे हे कागल विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी पोलीस संरक्षण मिळावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार दोन बंदूकधारी पोलीस शरीररक्षक त्यांना २४ तास सोबत दिले आहेत. त्यांच्यासोबत आमदार राजेश क्षीरसागर यांनाही मागणीनुसार दोन शरीररक्षक दिले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. देशमुख यांनी दिली.
सुहासिनीदेवी घाटगे यांना आलेल्या धमकीची सखोल चौकशी सुरू आहे. याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल असून अज्ञाताच्या शोधासाठी विशेष पथक नियुक्त केले आहे.संजय मोरे, निरीक्षक व तपास अधिकारी