कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी ‘एसआयटी’च्या पथकाने सनातन संस्थेच्या कारभार पाहणारे दुर्गेश सामंत, पांडुरंग मराठे आणि वीरेंद्र मराठे यांच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती ‘एसआयटी’च्या हाती लागली असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. गोवा (रामनाथी) येथील आश्रमात जाऊन फरार आरोपींबाबत पोलिसांनी संस्थेचे प्रमुख जयंत आठवले यांच्यासह संस्थेच्या विश्वस्तांची चौकशी केली आहे.पानसरे यांच्या हत्येमागे सनातन संस्थेतील काही लोक असल्याची शंका व्यक्त करून या संस्थेची चौकशी करण्याची मागणी पानसरे कुटुंबीयांनी केली आहे. पानसरे हत्त्येप्रकरणी पोलिसांनी अटक केलेले दोन्ही संशयित समीर गायकवाड आणि डॉ. वीरेंद्र तावडे हे सनातन संस्थेशी संबंधित आहेत. फरार आरोपींपैकी संशयित सारंग दिलीप अकोलकर (वय ३५, रा. पुणे) आणि विनय बाबूराव पवार (३७, रा. उंब्रज, जि. सातारा) हेदेखील सनातन संस्थेतील साधक होते. हे दोघे ‘सनातन’च्या गोव्यातील आश्रमात वास्तव्यास होते. या दोघांनीच या खून प्रकरणात पानसरे यांच्यावर गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा आरोप आहे व तसा उल्लेख पुरवणी दोषारोपपत्रातही आहे; परंतु हे दोघे सुमारे आठ वर्षांपासून फरार आहेत.याबाबत तपास अधिकारी सुहेल शर्मा यांच्या पथकाने २८ फेब्रुवारी व बुधवारी (ता. १) सलग दोन दिवस ‘सनातन’च्या गोवा (रामनाथी) येथील आश्रमात जाऊन संस्थेचे प्रमुख जयंत आठवले यांची तसेच रामनाथी आश्रमाचा कारभार पाहणारे दुर्गेश सामंत, पांडुरंग मराठे आणि संस्थेचे विश्वस्त वीरेंद्र मराठे यांचीदेखील पोलिसांनी चौकशी केली. फरार आरोपी पवार आणि अकोलकर यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. या चौकशीदरम्यान काही ठोस माहिती हाती लागल्याचा पोलिसांचा दावा आहे. ही माहिती न्यायालयासमोर मांडण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा चौकशी अहवाल एसआयटी प्रमुख संजयकुमार यांच्याकडे पाठविला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.इन कॅमेरा चौकशी...पानसरे हत्येबाबत सुरुवातीपासूनच सनातन संस्था संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. चौकशीच्या नावाखाली साधकांचा छळ होत असल्याचीही तक्रार संस्थेकडून होत आहे. संस्थेचे प्रमुख आठवले यांच्या चौकशीनंतरही अशीच तक्रार करण्याची संधी संस्थेला मिळू नये, यासाठी गोव्यातील स्थानिक पोलिसांसह पंचांसमक्ष संपूर्ण चौकशी इन कॅमेरा करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.पानसरे हत्येतील संशयित फरार आरोपींची माहिती मिळविण्यासाठी ‘सनातन’च्या गोव्यातील आश्रमात चौकशी केली आहे. जयंत आठवले यांच्यासह आश्रमाच्या इतर प्रमुखांच्या चौकशीतून मिळालेली माहिती न्यायालयात सादर करू.- संजयकुमार, एसआयटी प्रमुख
‘सनातन’च्या अन्य तिघांचीही चौकशी
By admin | Published: March 03, 2017 12:48 AM