कोल्हापूर : गुंतवणूक केलेल्या रकमेवर जादा परताव्याच्या आमिषाने सुमारे दहा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे उघड झाले. याप्रकरणी तक्रारीनुसार तिघा संशयितांवर राजारामपुरी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. क्रिप्टो करंन्सी आणि बीटकॉईनमध्ये गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून हा गंडा घातल्याचे दिसून आले.
केदार नारायण रानडे (रा. विश्वनाथ हौसिंग सोसायटी, टाकाळा रोड, राजारामपुरी, कोल्हापूर), अजय दोडमणी (रा. गोवा), सुकांता रणजित भौमिक (रा. पणजी गोवा. मूळ पश्चिम बंंगाल) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
सुहास शिवाण्णा नागण्णावर (वय ५५, रा. ताराबाई पार्क, कोल्हापूर) यांचा मार्केटिंगचा व्यवसाय आहे. त्यांची ओळख टाकाळा येथे मे २०१७ मध्ये संशयित केदार रानडे यांच्याशी झाली. त्यावेळी रानडे याने गोड बोलून फिर्यादीचा विश्वास मिळवला. त्याने त्यांची गोवा येथे सुकांता भौमिक या संशयिताशी भेट घालून दिली. विश्वास बसल्याने नागण्णावर यांनी जून २०१७ मध्ये कंपनीमध्ये २५ हजाराची गुंतवणूक केली, पंधरा दिवसात त्याचा परतावा १५ टक्केही मिळाला. जुलैमध्ये एक लाख रुपये गुंतवले व २७ दिवसांनी ३० टक्के परतावाही मिळाला.१० ऑक्टोबर २०१७ ला फिर्यादी नागण्णावर यांनी कोल्हापूर अर्बन बँक ताराबाई पार्क शाखेतून ५ लाख रुपये ‘आरटीजीएस’द्वारे कंपनीच्या गॉन गेम ऑनलाइन सर्व्हिस पीव्हीटी लिमो. कोटक महिंद्रा बँक अकाऊंटवर पैसे ट्रान्सफर केले. त्याच दिवशी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा ताराबाई पार्क येथे साक्षीदार संध्या नागण्णावर यांच्या अकाऊंटवरून ५ लाख रुपये आरटीजीएसद्वारे कंपनीच्या अकाऊंटवर ट्रान्सफर केले. संशयित सुकांता भौमिक याने फिर्यादी नागण्णावर यांना, तुमच्या पैशाचे मी बीटकॉईन घेतल्याचे सांगून, येत्या तीन-चार महिन्यात त्याचे ट्रेडिंग करून तुमचा परतावा देण्याचे आश्वासन दिले.पण पाठोपाठ १० कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याचा कंपनीचा मेल फिर्यादीला आल्याने ते खडबडले. संशयित आरोपींनी पुढील तीन महिन्यात गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्याचे कळवले. त्यानंतर फिर्यादी नागण्णवार यांनी संशयित केदार रानडे यांची वारंवार भेट घेतली. पण कंपनीने मलाच कमिशन देण्याचे नाकारल्याने मी कोणतीही मदत करु शकत नसल्याचे सांगून हात वर केले. फसवणूक झालेल्या नागण्णावर यांनी अखेर राजारामपुरी पोलिसात फसवणुकीची तक्रार दिली.
जादा टक्के परताव्याचा फार्स
रानडे याने फिर्यादी नागण्णावर यांना क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास ७ दिवसाला ३ टक्के, १४ दिवसाला ७ टक्के आणि ३० दिवसाला १५ टक्के परतावा दिला जात असल्याचा विश्वास दिला. तसेच कंपनी कोणतेही व्यवहार रोख नव्हे तर बँकेमार्फत पैसे स्वीकारते व गुंतवणूकदारांना परतावा देते असेही सांगितले.