कोल्हापूर : पी. ए. सी. एल. (पर्ल्स) गुंतवणूकदारांची रक्कम हडप करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय ‘पर्ल्स’ गुंतवणूकदार संघटनेतर्फे शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला.दुपारी साडेबाराच्या सुमारास ‘पर्ल्स’चे गुंतवणूकदार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकवटले. या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निदर्शने करण्यात आली. यानंतर मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना सादर करण्यात आले.निवेदनात म्हटले आहे की, देशातील ६ कोटी पर्ल्स गुंतवणूकदारांची सर्व रक्कम देण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने २ फेब्रुवारी २०१६ ला पर्ल्स कंपनीला दिले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्व कंपनीसंदर्भातील २८८०८ इतक्या मालमत्ता ‘सेबी’मार्फत सिल करण्यात आल्या आहेत.
१ लाख ८० हजार कोटी इतकी पर्ल्सची मालमत्ता निश्चित झालेली असून, त्याची लिलाव प्रक्रिया मात्र संत गतीने सुरू आहे; त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आदेश करूनही अडीच वर्षे झाली तरीही, अद्याप देशातील एकाही पर्ल्स गुंतवणूकदारांना नया पैसा मिळालेला नाही.
दक्षिण महाराष्ट्रामध्ये लाखो गुंतवणूकदारांनी करोडो रुपयांची गुंतवणूक पर्ल्स कंपनीमध्ये केलेली आहे. गुंतवणूकदारांची जमीन देण्याच्या नावाखाली पर्ल्स व्यवस्थापकांनी पर्ल्सच्या मालमत्तेवर स्वत:ची मालकी लावलेली आहे.
अशा प्रकारे कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा व पुणे येथील पर्ल्स मालमत्तेचे मालक म्हणून ज्यांनी आपली नावे लावून घेतली आहेत. त्या सर्वांना अटक करून या मालमत्तेची विक्री करून किंवा ही मालमत्ता विक्री करण्यास गुंतवणूकदारांना परवानगी मिळून त्यांची रक्कम त्वरित मिळावी.
आंदोलनात महेश लोहार, शिवकुमार हेंद्रे, विठ्ठल फाकडे, बी. आर. जाधव, प्रताप गर्जे, विजय बचाटे, शंकर पुजारी, आदींसह गुंतवणूकदार सहभागी झाले होते.